🕒 1 min read
मुंबई : रोहित शर्माने ६ वर्षांपूर्वी केलेल्या वक्तव्यावर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने प्रतिक्रिया दिली आहे. २०१६मध्ये बांगलादेशमध्ये खेळल्या गेलेल्या आशिया कपदरम्यान रोहित शर्माने मोहम्मद आमिरचे वर्णन ‘सामान्य गोलंदाज’ असे केले होते. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यानंतर रोहितने हे वक्तव्य केले आहे. या सामन्यात आमिरने अप्रतिम गोलंदाजी करत भारताच्या टॉप ऑर्डरला उद्ध्वस्त केले.
या सामन्यात आमिरने ४ षटकात १८ धावा देत ३ बळी घेतले. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेला पहिल्याच षटकात आमिरने बाद केले. यानंतर तिसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या आमिरने सुरेश रैनाला बाद केले. आता या संपूर्ण प्रकरणावर आमिरने प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तानच्या स्थानिक मीडिया चॅनलशी बोलताना मोहम्मद आमिर म्हणाला, ”मी रोहित शर्माच्या वक्तव्याला गांभीर्याने घेत नाही. प्रत्येकाचे स्वतःचे मत आहे आणि प्रत्येकजण माझ्याकडे जागतिक दर्जाचा गोलंदाज म्हणून पाहणे अशक्य आहे. रोहित जागतिक दर्जाचा फलंदाज आहे यात शंका नाही. रोहितविरुद्ध मी नेहमीच चांगली गोलंदाजी केली आणि तो माझ्या गोलंदाजीविरुद्ध संघर्ष करत होता, तरीही मी त्याला जागतिक दर्जाचा खेळाडू मानतो.”
मोहम्मद आमिर भारताविरुद्ध खूप यशस्वी ठरला आहे. आमिरने रोहित शर्माला एकदिवसीय सामन्यांमध्ये एकदा आणि टी-२० सामन्यांमध्ये दोनदा आपला बळी बनवले आहे. २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आमिरने भारताविरुद्ध घातक गोलंदाजी केली होती. त्या सामन्यात आमिरने ६ षटकात अवघ्या १६ धावांवर भारताच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना बाद केले होते. यामध्ये रोहित शर्मा (०), शिखर धवन (२१) आणि विराट कोहली (५) यांच्या विकेट्सचा समावेश आहे. या सामन्यात आमिरच्या गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने भारताचा १८० धावांनी पराभव केला.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
