🕒 1 min read
जेजुरी : भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा ताफा पोलिसांकडून अडवण्यात आलेला आहे. यावेळी मोठा राडा झालेला दिसून येतोय. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत या गोष्टीचा निषेध केला आहे. आज अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत चोंडी या ठिकाणी जात होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रतीबंधात्मक कारवाई म्हणून त्यांना तिथे जाण्यापासून रोखण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या समर्थकांची झटापट सुरु झाली. कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी केली. पडळकर आणि खोत यांनी यावेळी शरद पवारांवर जोरदार टीका केली.
“काहीही झालं तरी मी चौंडीला जाणारच आणि अहिल्याबाईंना अभिवादन करणारच”, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय. “चौंडीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक कार्यक्रम आयोजित केला. त्यांना परवानगी दिली जाते, पण आम्हाला आमच्या प्रेरणास्थानाला, उर्जा स्थानाला अभिवादन करण्यापासून रोखण्याचं कारण काय? हो कोणत्या संविधानात बसतं”, असा सवाल पडळकरांनी विचारलाय.
यावेळी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. “मी लहान असल्यापासून चौंडीला अहिल्यादेवींच्या दर्शनासाठी येत आहे. पण आम्हाला अशा रितीने कधी अडवण्यात आले नाही. आज शरद पवार यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे आम्हाला रोखण्याचा प्रयत्न होत आहे. शरद पवार यांनी अहिल्यादेवींच्या जयंतीच्या कार्यक्रमात राजकारण आणले. शरद पवार यांनी आमच्या चार पिढ्या बरबाद केल्या. रोहित पवार हे त्यांचं सुधारित व्हर्जन आहे. आम्ही त्यांना आमच्या मानगुटीवर बसून देणार नाही,” असे पडळकर यांनी म्हटले.
पडळकर यांच्यासोबतच सदाभाऊ खोत देखील उपस्थित आहेत. त्यांनीही पवारांवर टीका केलीये. “चौंडीचा सातबारा पवारांच्या नावावर नाही. ती पवारांची जहागिरी नाही, त्यामुळे आम्हाला अडवण्याचा त्यांना अधिकार नाही”, असं सदाभाऊ खोत म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
