🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज शनिवारी डबल हेडरचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (GT vs RCB) यांच्यात खेळला गेला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात गुजरातने बंगळुरुला ६ गड्यांनी आरामात मात दिली. या विजयासह गुजरातचे १६ गुणांसह प्लेऑफमधील स्थान निश्चित झाले आहे. या सामन्यात बंगळुरूचा कप्तान फाफ डु प्लेसिसने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मागील काही काळापासून वाईट फॉर्मशी झगडणाऱ्या विराट कोहलीने अर्धशतक ठोकले आणि बंगळुरूने गुजरातला १७१ धावांचे आव्हान दिले. विराटसोबत रजत पाटीदारनेही अर्धशतक ठोकले. गुजरातकडून अनुभवी गोलंदाज प्रदीप सांगवाननेही २ बळी घेत आपले कमबॅक साजरे केले. प्रत्युत्तरात गुजरातकडून राहुल तेवतिया (नाबाद ४३) आणि डेव्हिड मिलर (नाबाद ३९) अर्धशतकी खेळी करत गुजरातला सहज विजय मिळवून दिला.
गुजरातचा डाव
बंगळुरुच्या आव्हानाचा पाठलाग करताना वृद्धिमान साहा आणि शुबमन गिल यांनी पहिल्या गड्यासाठी ५१ धावा केल्या. फिरकीपटू वानिंदू हसरंगाने साहाला (२९) बाद करत बंगळुरुला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर शाहबाझ अहमदने गिलला (३१) पायचीत पकडले. कप्तान हार्दिक पंड्याला हसरंगाने (३) स्वस्तात बाद केले. त्यानंतर राहुल तेवतिया आणि डेव्हिड मिलर यांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला शेवटच्या षटकात ३ चेंडू आणि ६ गडी राखून राखून विजय मिळवून दिला. तेवतियाने २५ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ४३ तर मिलरने ४ चौकार आणि एका षटकारासह ३९ नाबाद धावा केल्या.
A tricky chase looked easy after another Tewatia – Miller special ???? #IPL2022
Gujarat Titans are making a habit of closing out games ???? #GTvRCB
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 30, 2022
बंगळुरुचा डाव
कप्तान फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली यांनी पुन्हा एकदा डावाची सुरुवात केली. गुजरातचा वेगवान गोलंदाज प्रदीप सांगवानने डु प्लेसिसला शून्यावर यष्टीपाठी झेलबाद केले. त्यानंतर विराट कोहलीने आत्मविश्वासाने फलंदाजी केली. रजत पाटीदारनेही त्याला उत्तम साथ दिली. १३व्या षटकात विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले. तब्बल १४ डावानंतकर विराटने आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावले. विराटनंतर रजतनेही आपले २९ चेंडूत अर्धशतक साजरे केले. सांगवानने १५व्या षटकात रजतला झेलबाद करत ही भागीदारी मोडली. पाटीदार-कोहलीने ९९ धावांची भागीदारी केली. १७व्या षटकात मोहम्मद शमीने विराटला क्लीन बोल्ड करत डाव संपुष्टात आणला. विराटने ६ चौकार आणि एका षटकारासह ५८ धावा केल्या. दिनेश कार्तिकला (२) राशिद खानने लवकर तंबूत पाठवले. ग्लेन मॅक्सवेलने ३ चौकार आणि २ षटकारांसह ३३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. २० षटकात बंगळुरुला ६ बाद १७० धावा करता आल्या. सांगवानने ४ षटकात १९ धावांत २ बळी घेतले.
दोन्ही संघांची Playing 11
गुजरात टायटन्स – शुबमन गिल, ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कप्तान), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, प्रदीप संगवान, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डु प्लेसिस (कप्तान), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, महिपाल लोमरोर, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
