🕒 1 min read
मुंबई: विरोधकांनी एकजुटीसाठी पाऊल पुढे टाकणे म्हणजे सर्वात आधी ‘यूपीए’चा जीर्णोद्धार करणे. ‘यूपीए’चा सातबारा सध्या काँग्रेसच्या नावावर आहे. त्यात बदल केल्याशिवाय विरोधकांची भक्कम एकजूट होणे शक्य दिसत नाही. शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, केजरीवाल, के. सी. रा, एम. के. स्टॅलिन हे सर्व तालेवार लोक आहेत व नव्या एकजुटीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा होणे आवश्यक आहे. यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला नाही म्हणून ममता बॅनर्जी यांना पुढे यावे लागले. त्यांनी ‘पुरोगामी’ शक्तींना साद घातली आहे. उत्तर प्रदेशात भाजपचा विजय झाला तो समोर सेक्युलरवादाचे अजीर्ण झाल्यामुळे देश सगळ्यांचा आहे. पण बहुसंख्य हिंदू समाज देशाचा मुकुटमणी आहे. विरोधकांच्या नव्या आघाडीने या विचाराचे भान ठेवले तरच भाजपविरोधी आघाडीस बळ मिळेल व ‘ यूपीए’चा जीर्णोद्धार शक्य आहे. असे मत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून मांडले आहे.
पंजाब वगळता चार राज्यांतील विधानसभा निवडणुका जिंकूनही मोदी पक्ष समाधानी दिसत नाही. केंद्रात अमर्याद सत्ता असली तरी बिगर भाजपशासित राज्यांना काम करू द्यायचे नाही असा त्यांचा अजेंडा आहे. अशा राज्यांत रोजच अडथळा व अडचणी निर्माण करून लोकशाहीची पायमल्ली सुरू आहे. या मनमानीविरुद्ध बिगर भाजप पक्षांना एकजुटीचे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले आहे. ममता बॅनर्जी यांनी अशा सर्व मुख्यमंत्र्यांना आणि पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. सर्व ‘पुरोगामी’ शक्तींनी एकत्र येऊन भाजपच्या मनमानी, एकाधिकारशाहीशी लढा द्यावा, असे ममतांनी काँग्रेससह अन्य पक्षांच्या प्रमुखांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ममतांनी हे पत्र काँग्रेसच्या प्रमुखांनाही लिहिले आहे. म्हणजे काँग्रेसशिवाय विरोधकांची एकजूट शक्य नाही हे त्यांनी मान्य केले.
काँग्रेस हा विरोधी पक्ष म्हणून टिकलाच पाहिजे. काँग्रेस संपता कामा नये, असे मत नितीन गडकरींसारख्या भाजपच्या नेत्याने, केंद्रीय मंत्र्याने मांडले. याचा अर्थ असा की, दिल्लीत सध्या जी राजकीय व्यवस्था आहे, त्यांना विरोधी पक्षाचे अस्तित्वच नष्ट करायचे आहे. अशी तयारी काही मंडळींनी सुरूही केली आहे. उत्तर प्रदेशात भाजप जिंकला हे ठीक; पण हाथरस, उन्नाव, लखीमपूर खिरी येथील भयंकर घटना-घडामोडींनंतरही तेथे भाजपचा विजय होऊ शकतो याबाबत लोकांच्या मनात शंका आहेत. येथील बलात्कार , महिला अत्याचाराविरोधात लोकांच्या मनात रोष होता तरीही त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले. हे आक्रित आहे. काही केले तरी आम्हीच निवडणुका जिंकून दाखवतो हे तंत्र ज्या राज्यव्यवस्थेपाशी आहे, त्यांच्या विरोधात लढणे कठीण असले तरी अशक्य नाही. असे संजय राऊत यांनी सामना अग्रलेखात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- VIDEO: हसरंगाच्या गुगलीचा शेल्डन जॅक्सन ठरला बळी, चेंडू पडल्यानंतर कसा वळला ते तुम्ही पाहाच
- IPL 2022 RCB vs KKR : हसरंगाचा ‘अतरंगी’ स्पेल..! कोलकाताचं बंगळुरुला १२९ धावांचं आव्हान
- विराटच्या फिटनेसवर श्रीलंकेचा क्रिकेटर घायाळ; म्हणाला, “तो माझ्यासाठी रोनाल्डोच”!
- IPL 2022 RCB vs KKR : बंगळुरुचा कप्तान फाफ डु प्लेसिसने जिंकला टॉस; प्रथम करणार…
- Shane Warne State Funeral MCG : गूड बाय शेन..! फिरकीच्या जादुगाराला ऑस्ट्रेलियाकडून अंतिम निरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
