🕒 1 min read
मुंबई : ५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांची पंजाबमधील फिरोजपूर येथील सभा सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवर आंदोलकांमुळे सुमारे १५ ते २० मिनिटे अडकून पडला. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay raut) यांनी आपल्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून याविषयी भाष्य केले आहे. लेखातून राऊत यांनी कॅ.अमरिंदर सिंह(Amrindr Singh) यांनाही चांगलाच टोला लगावला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,’देशाचे नेतृत्व करणाऱ्या अनेकांना कधी ना कधी धोकादायक प्रसंगांना सामोरे जावे लागलेच आहे. पंतप्रधान मोदी यांच्याबाबतीत पंजाबात जे घडले ते चिंताजनक, तितकेच धक्कादायक आहे. देवाच्या कृपेने मोदी सुखरूप परत आले म्हणून देवांचे आभार. तरीही पंजाबातील सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. आम्ही तर म्हणतो, विषय देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीचा असल्यामुळे संयुक्त संसदीय समिती स्थापन करून या प्रकाराची चौकशी व्हायला हवी. म्हणजे ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल. पुलवामा ते पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी हा चिंतेचाच विषय आहे. आम्ही मोदी यांना निरोगी दीर्घायुष्य चिंतितो.’
पुढे ते म्हणाले की,’पंजाबात काँग्रेसची राजवट आहे. कॅ. अमरिंदर यांच्यावर भरवसा दाखवून भाजपने त्यांच्याशी युती केली व शेतकऱयांचे प्रश्न सोडवू असे वचन कॅ. अमरिंदर यांना दिले. तरीही शेतकऱ्यांनी पंजाबात पंतप्रधान मोदींविरोधात आंदोलन केले. त्यामुळे कॅ. अमरिंदर यांचा बार फुसका आहे हे समोर आले. फिरोजपूरला पंतप्रधानांची जाहीर सभा होती. सभेसाठी किमान पाच लाख शेतकरी जमतील असे ढोल वाजविण्यात आले. पाच हजार बसेसची व्यवस्था माणसे जमविण्यासाठी करण्यात आली, पण फिरोजपूरचे सभास्थान मोकळेच राहिले. हीसुद्धा देवाचीच कृपा म्हणायची काय? प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नये. कोणी आणायचा प्रयत्न केला तर मग हल्ले आणि प्रतिहल्ल्यांची तयारी ठेवायला हवी.’
दरम्यान, पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी ते ज्या राज्यात जातात त्या राज्याचीच असू शकते. पण केंद्र सरकारचीही एक जबाबदारी असतेच. या घटनेची गंभीर दखल पंजाबच्या सरकारने घेतली व फिरोजपूरच्या पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्यात आले, पण केंद्रीय स्तरावर अशी कारवाई कोणावर झाली काय? फिरोजपूरच्या रस्त्यावर आंदोलक येऊ शकतात, याची माहिती केंद्रीय गुप्तचर विभागास नसावी याचे आश्चर्य वाटते. पाकिस्तान, अमेरिका, युरोपातील अंतर्गत घटनांची खबर आमच्या गुप्तचर विभागास असते, पण आपल्या पंतप्रधानांच्या दौऱयात अडथळे येऊ शकतात याची माहिती नसावी हे न पटणारे आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार पंतप्रधान भटिंडा विमानतळावरून हेलिकॉप्टरने जाणार होते. खराब हवामानामुळे त्यांनी मोटारीने जाण्याचा निर्णय घेतला. हा प्रवास १२५ किलोमीटरचा होता. आपले पंतप्रधान इतका लांबचा प्रवास अचानक कसा करू शकतात? ‘एसपीजी’ने त्यांना या प्रवासाची परवानगी दिली कशी?’, असा सवालही लेखाच्या शेवटी राऊतांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “बुलेटप्रूफ कवच असलेल्या गाड्यांमुळे नव्हे, तर देवकृपेने आपले पंतप्रधान वाचले”
- पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे नाही – संजय राऊत
- सारा तेंडुलकर आणि शुभमन गील रिलेशनशिपमध्ये?; ‘त्या’ फोटोमुळे पुन्हा चर्चेला उधाण
- ‘पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली’; नाना पटोलेंचा हल्लाबोल
- दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूने अल्लू अर्जुनसाठी केलेल्या ‘त्या’ पोस्टमुळे चाहत्यांमध्ये नाराजी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
