🕒 1 min read
नांदेड : आर्यन खान प्रकरण रोज नवनवे वळण घेत आहे. आर्यन खान प्रकरणातील पंच असलेल्या प्रभाकर साईलने अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. तर, अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे देखील वानखेडेंवर सातत्याने आरोप करत आहेत. यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘आता मराठी माणसावर अन्याय होत असताना मराठी माणसाचा पुळका करणारी शिवसेना गप्प का बसली आहे? हिम्मत असेल तर समीर वानखेडेवर कारवाई करून दाखवा, मग पुढचा कार्यक्रम आम्ही करू’, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणूक प्रचारादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.
राणे म्हणाले की, भाजपकडून सचिन वाझेवर कारवाई करण्याची मागणी केली असता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो ओसामा बिन लादेन आहे का, असा प्रश्न विधिमंडळात उपस्थित केला होता. आता आम्ही विचारतो वानखेडे काय दाऊद इब्राहिम आहेत का? तुम्हाला वानखेडेंवर राग आहे, तर सचिन वाझेवर इतके प्रेम का? तुमचे हप्ते घरी आणून देत होता म्हणून का, असाही प्रश्न राणे यांनी उपस्थित करून शिवसेनेवर टीका केली. तर शाहरुख खानकडे इतका पैसा झाला आहे, की खासदार संजय राऊत व नवाब मलिक यांना त्याने भाड्याने घेतले आहे, असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे.
त्यापूर्वी सिंधुदुर्ग येथे टीका करताना नितेश राणे म्हणाले होते की, नबाव मलिक हे पाकिस्तानचे ड्रग्ज माफिया आहेत. त्यांच्यामुळे भविष्यातील पिढी खराब होणार आहे. त्यामुळेच एनसीबीने ड्रग्ज माफियांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. पण नवाब मलिक हे एनसीबीला बदनाम करत आहेत. माफियांची हिंमत वाढविण्याचे काम करत आहेत. जावयाला अटक केली म्हणून ते एनसीबीवर टीका करत आहेत. काम करणाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे हे त्यांना कळत नाही, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- जगाला सध्या धार्मिक, आर्थिक व राजकीय दहशतवादापासून धोका-रामदेव बाबा
- ‘देख लो यारो, गधे घोडे दौडा रहे है…’; भातखळकरांचा मलिकांना टोला
- ईडी म्हणजे पानतंबाखुचे दुकान, माझ्या घरीही धाड पडू शकते-आ. प्रणिती शिंदे
- ‘मोदी सरकारने पीक विम्याचा हप्ता रोखला’, सचिन सावंत यांचा आरोप
- “इस दुनिया का आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं”; मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

