मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना भाजप आमदार नितेश राणे यांचा तोल गेला. काल विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भरविण्यात आलेल्या प्रतिविधानसभेत बोलताना आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचे वंशज आहेत का? यासाठी त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल, असं वादग्रस्त आणि आक्षेपाचे वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. त्यानंतर मुंबईत शिवसैनिकांनी जोरदार राडा केला. आता त्यानंतर नितेश राणे यांच्याकडून ‘भावना दुखावल्या असल्यास शब्द मागे घेतो’ असं ट्विट करण्यात आलं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सुसंस्कृत आणि सभ्य समजल्या जाणाऱ्या राजकारणात अनेक नेत्यांचा टीका करताना तोल जात असल्याचे दिसून येत आहे. राणे बंधू, गोपीचंद पडळकर, सक्षणा सलगर, अमोल मिटकरी, अतुल भातखळकर, संजय राऊत, संजय गायकवाड या सारखे नेते वारंवार नेते वादग्रस्त विधाने करून वारंवार माध्यमांमध्ये चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात असे दिसून आले आहे.
राणे बंधू हे नेहमीच शिवसेनेवर टीका करण्यात आघाडीवर असतात. सेनेच्या नेत्यांवर टीका करताना अनेकदा ते जहरी टीका करत असतात. ठाकरे कुटुंब, शिवसेना,मंत्री उदय सामंत, विनायक राऊत, पवार कुटुंब यांच्यावर टीका करताना अनेकदा त्यांच्यावर पातळी सोडून टीका केल्याचा आरोप होतो.
संजय राऊत हे सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. अनेकदा ते भाजप नेत्यांवर टीका करत असतात. यापूर्वी देखील विरोधकांवर टीका करण्यासाठी वापरण्यात आलेल्या सामनातील टीकेसाठी वापरल्या जाणाऱ्या भाषेवरून वाद निर्माण झाला आहे. अभिनेत्री कंगना रनौतवर टीका करताना संजय राऊत यांनी पातळी सोडल्याची टीका झाली होती. छत्रपतींच्या वंशजांबाबत देखील त्यांनी केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा झाली होती.
गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे प्रश्न अत्यंत आक्रमकपणे मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत मात्र विरोधकांना लक्ष्य करताना अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाल्याचे देखील दिसून आले आहे. पडळकर यांच्या निशाण्यावर कायम पवार कुटुंबीय असतात. शरद पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यावर टीका करण्याची संधी पडळकर कधीच सोडत नाहीत.
सक्षणा सलगर या राष्ट्रवादीच्या युवती विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत. नुकतीच त्यांना पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी धमकी दिल्यामुळे त्या चर्चेत आहेत. मात्र त्या देखील विरोधकांवर टीका करताना अनेकदा पातळी सोडताना दिसून येतात. मोदी आणि फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर अजित पवारांनी त्यांना जाहीर सभेत झापलं होतं.
अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीचे आमदार असून आपल्या आगळ्यावेगळ्या भाषण शैलीसाठी त्यांना ओळखले जाते. मिटकरी यांचा देखील विरोधकांवर टीका करताना अनेकदा तोल जाताना दिसून येतो. मिटकरी हे नेहमीच भाजप, संघ, मोदी आणि फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी पुढे असतात.
शिवसेनेचे वाचाळ आमदार संजय गायकवाड हे देखील गेल्या काही दिवसांपासून वारंवार वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस, चंद्रकात पाटील, वारकरी संप्रदाय याबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती.नुकतेच त्यांनी दलित समाजाला दुखावणारे एक वक्तव्य केल्याने देखील मोठा वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान, हे नेते फक्त प्रातिनिधिक स्वरूपात आपण पाहिले पण या आणि अशा अनेक नेत्यांचा भरणा सर्वच पक्षात आहे. महाराष्ट्रातील सभ्य राजकीय संस्कृतीची परंपरा जपायची असेल तर सर्वानीच मर्यादांचे पालन करणे आवश्यक आहे.अनेकदा या नेत्यांचा बचाव करताना त्यांच्या बोलीभाषेत असेच बोलले जाते असं सांगितले जाते. मात्र तरीही कुणावर टीका करताना जरा भान तर रखालेच पाहिजे. आपण मर्यादा उल्लंघन करणाऱ्या नेत्यांना रोखणार नसू तर मग इतर पक्षांकडून सन्मानाने वागणूक मिळण्याची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे हे सर्वच पक्षांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘जे तीस वर्षात झालं नाही ते आता काय होणार ?’; भाजपच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंच भाष्य
- राष्ट्रवादीच्या नेत्याचे शिवसेनेच्या मंत्र्यांवर गंभीर आरोप, लाचलुचपत विभागाकडे केली तक्रार
- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपने नेमकं काय कमावलं आणि काय गमावलं ?
- पालखीस परवानगी नाकारली, महाराजांचा वारकर्यांसहित आत्मदहनाचा इशारा!
- अधिवेशन संपले तरीही अडचणी सुरूच; मुख्यमंत्र्यांच्या समोर आता नवे आव्हान काय असणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
