मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. याप्रकरणाचा तपास सध्या ईडीकडून सुरु आहे. या तपासात ईडीच्या हातात अनेक पुरावे लागत आहेत. ईडीने मुंबईत काही बार मालकांची चौकशी केली असता देशमुखांना ४ कोटींचा हप्ता दिल्याची कबुली जबाब त्यांच्याकडून नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दरम्यान आता निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याने अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरुन डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये मुंबईच्या काही पब्स, बारच्या मालकांकडून चार कोटीहून अधिक वसुली केली. ईडीच्या म्हणण्यानुसार वाझेने देशमुखांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना हे पैसे दिले, असा खुलासा या मालकांनी ईडीकडे केला आहे. यामुळे अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडी अधिक आक्रमक होत असून त्यांचे स्वीय सहाय्यक हे सध्या ईडी कोठडीत आहेत.
तर, येत्या काही दिवसांत अनिल देशमुख यांची रवानगी जेलमध्ये होईल. ते छगन भुजबळ यांच्या वाटेवर आहेत, असं खळबळजनक विधान भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलं आहे. राज्यात महाविकास आघाडी आल्यापासून विविध प्रकरणांमधून सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांसह शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे वळवला असून त्यांना देखील राजीनामा द्यावा लागून चौकशीला सामोरं जावं लागेल असा दावा सोमय्या करत आहेत.
‘देशमुख जेलमध्ये जाणार. अनिल परब पण याच मार्गाने जात आहेत. भुजबळ देशमुखनंतर अनिल परब पण जेलमध्ये जाणार, त्यानंतर मिलिंद नार्वेकर पण जाणार’ असं विधान किरीट सोमय्या यांनी केलं आहे. तसंच, अनिल देशमुख यांनी वाझे प्रकरणातील पैसे हे कोलकत्ता मधील बोगस कंपनीच्या माध्यमातून, नातेवाईकांच्या नावाने बांधकाम व्यवसायात गुंतवले असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
कोण आहेत मिलिंद नार्वेकर आणि सोमय्या त्यांच्यावर आरोप का करत आहेत ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहनमंत्री अनिल परब,खा. संजय राऊत, प्रताप सरनाईक,रवींद्र वायकर या सारख्या अनेक सेना नेत्यांच्या मागे किरीट सोमय्या हात धुवून मागे लागल्याचे दिसून येते. मुद्देसूद आणि पुराव्यांच्या आधारे बोलण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सोमाय्यांच्या रडारवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आले आहेत.
मिलिंद नार्वेकर यांनी कोणतीही परवानगी न घेता कोकणात दापोलीमध्ये समुद्र किनारी बंगला बांधला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी रत्नागिरी जिल्ह्यात जाऊन नार्वेकरांच्या बंगल्याची पाहणी केली. महाविकास आघाडी सरकार नार्वेकरांना पाठिशी घालत असल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांचा डावा हात असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी दापोलीत मुरुड गावाच्या समुद्र किनाऱ्यावर 72 गुंठा जागा घेतली, त्यात कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता गैरकायदेशीररित्या भव्य दुमजली बंगल्याचे काम जोरात सुरु केले आहे. मोठ्या प्रमाणात जंगलाची, झाडांची नासधूस सुरु आहे. तसेच मोठं उत्खननही चाललं आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. कोरोना महामारीमुळे नागरिक त्रस्त असताना नियमांना बगल देऊन लॉकडाऊनच्या काळात भव्य रिसॉर्ट आणि बंगले नार्वेकर आणि परब यांनी बांधल्याचा दावा देखील त्यांनी केलाय.
महत्त्वाच्या बातम्या
- एकाबाजूला ईडी, सीबीआयच्या नावाने राष्ट्रवादीची बोंब, तर सुप्रिया सुळेंच समर्थन ?
- वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या भाजप खा.साक्षी महाराजांची फसवणूक
- अॅथलेटिक्स ट्रॅकवर नेत्यांच्या गाड्या, पवारांच्या प्रकृतीच्या कारणाचा केदारांनी केला ढालीसारखा वापर
- ‘दलितांच्या मतांवर आरपीयचाही हक्क’ ; उत्तरप्रदेशात भाजपकडे केली ‘इतक्या’ जागांची मागणी
- पंजाबमध्ये ‘आप’ जिंकल्यास नागरिकांना मोफत वीज देणार; केजरीवालांची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
