🕒 1 min read
जालना: जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असून सध्या ६ हजार ५१३ ऍक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील गंभीर रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा मागील १५ दिवसांपासून तुटवडा निर्माण झाला होता. यातही मागील तीन दिवसांपासून कंपनीकडून पुरवठाच नव्हता. यामुळे रुग्णांसह नातेवाइकांचे प्रचंड हाल झाले. इंजेक्शनसाठी अक्षरक्ष: भटकंती करावी लागली. मात्र, बुधवारी पालकमंत्री राजेश टोपे यांनी दहा हजार रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले असून याचे प्रातिनिधिक स्वरूपात खासगी रुग्णालयांना वाटप केले. यामुळे रुग्णांना माेठा दिलासा मिळाला आहे.
मंत्री टोपे म्हणाले, राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा हाफकिनमार्फत करण्यात येतो. रेमडेसिविर इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या सात कंपन्यांमार्फत टेंडर प्रक्रिया राबवून खरेदीची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. सर्व खासगी दवाखाने ज्या ठिकाणी कोविडबाधितांवर उपचार करण्यात येतात, अशा रुग्णालयांना इंजेक्शनचा पुरवठा समान पद्धती व मागणीनुसार व्हावा तसेच या इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनामार्फत एका स्टॅकिस्टला अधिकृत केले आहे.
ब्रेक द चेनअंतर्गत १ मेपर्यंत राज्य शासनाने निर्बंध लावले आहेत. या काळात नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न जाता घरातच राहून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले. यावेळी त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात खासगी रुग्णालयांना रेमडेसिविरचे वाटप केले.
महत्वाच्या बातम्या
- ‘आम्ही कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं मात्र भाजपामुळे संसर्ग पुन्हा वाढला’
- राज्यपालांनी आपापल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सक्रीय सहकार्य करावं – नायडू
- चिंता वाढली! जालन्यात ११६ हॉटस्पॉट,लोकांच्या येण्या-जाण्यावर नियंत्रणाची गरज
- खासदार श्रीकांत शिंदे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटीव्ह
- दु:खद! ‘या’ वर्ल्डकप हिरोच्या आईचे कोरोनामुळे निधन


