औरंगाबाद : शासन निर्देशानुसार महापालिकेच्या सरकारी केंद्रांवर १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरुवातीच्या पाच के सहा दिवसातच बंद करण्यात आले आहे. या केंद्रांवर केवळ ४५ वर्षांपुढील नागरिकांनाच लस दिली जात आहे. मात्र शहरातील एका खासगी हॉस्पीटलच्या केंद्रांवर १८ वर्षांवरील नागरिकांचे तब्बल नऊशे रूपये शुल्क घेऊन सर्रास लसीकरण केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रुग्णालयाने थेट कंपनीकडून लसी विकत घेतल्या आहेत.
केंद्र सरकारने जारी केलेल्या निर्देशांनुसार औरंगाबाद शहरात १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्व व्यक्तींच्या मोफत लसीकरणाला प्रारंभ झाला होता. पालिकेने शहरातील ११५ केंद्रांवर ही मोहीम हाती घेतली होती. मात्र, पुढे शासनाकडून लसींचा अत्यल्प पुरवठा होत असल्याने ही मोहीम बंद झाली आहे. लसींचा साठा विचारात घेऊन शासनानेही १० मेपासून शहरात १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण तात्पुरते बंद केले.
तेव्हापासून शहरात केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांचेच लसीकरण केले जात आहे. दरम्यान, सोमवारपासून शहरातील एका खासगी हॉस्पीटलच्या केंद्रावर मात्र अचानकपणे १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. विशेष म्हणजे, एका डोससाठी हे हॉस्पीटल तब्बल नऊशे रुपये शुल्क आकारत आहे.
पालिकेच्या डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, एका खासगी हॉस्पीटलने थेट कंपनीकडून लस खरेदी केली आहे. त्यानुसार ते लसीकरण करत आहेत. त्यासाठीही कोवीन अॅपवरुन नोंदणी करुनच लस द्यावी, असे आदेश आहेत. तुर्तास पालिकेच्या केंद्रांवर केवळ ४५ वर्षांवरीलच लसीकरण सुरू आहे. शासनाकडून आदेश मिळाल्यानंतरच सरकारी केंद्रांवरही १८ वर्षांपुढील नागरिकांना लस दिली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
- मनपा प्रशासनास आली जाग, औषधी भवनजवळील नाल्याचे काम अखेर सुरु!
- ‘काँग्रेसच्या शशी थरूर यांची खासदारकी रद्द करा’, भाजपची मागणी
- वयाच्या तेविसाव्या वर्षापर्यंत अनाथालयात राहता येणार, शहरातील बालकाश्रमांकडून निर्णयाचे स्वागत!
- कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी राज ठाकरेंनी लिहले ‘हे’ खास पत्र
- ‘आज रात्रीपर्यंत काहिही होऊ शकते, मित्रानो तुम्हा सर्वांची खूप जास्त आठवण येईल’; शालूची भावूक पोस्ट


