सातारा : नगरपालिकेची निवडणूक जवळ येत आहे. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosle) यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. सातारा नगरपालिका ही भ्रष्टाचाराचे कुरण झालेली आहे, तिथं नुसत चरायच आणि आपले खिसे भरायचे एवढच झाले असल्याचा घणाघात आमदार शिवेंद्रराजेंनी खासदार उदयनराजेंवर केला होता. दरम्यान उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजेंवर पलटवार केला आहे.
उदयनराजे म्हणाले, “सातारा शहराच्या व शहरवासीयांच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही सुरु केलेली इनोव्हेटीव्ह सातारा ही योजना, समाजाची आणि समाजहित साध्य करुन घेण्याची, चिरकाल चालणारी योजना आहे. ज्या लोकांना इनोव्हेटीव्ह सातारा या शब्दाचा अर्थ आणि शब्दाचे स्पेलिंग अचुक सांगता येणार नाही त्यांनी आमच्या इनोव्हेटीव्ह सातारा या उपक्रमाविषयी काही बोलु नये.”
“जनमानसात आमची एक वेगळी छबी आहे. आम्ही सामान्य जनतेकरीताच आजपर्यंत जीवन व्यतीत केले आहे. काहींना आमची धडाडी आणि लोकप्रियता खुपत असते म्हणूनच कथित भ्रष्टाचाराचे मोघम आणि बिनबुडाचे आरोप करणे हा त्यांचा स्थायी भाव बनला आहे. लोकांच्या गतीमान सोयी, सुविधांसाठी कोणत्या योजना राबविणे, लोकहिताची अंमलबजावणी करणे ही जर भ्रष्टाचाराची व्याख्या असेल तर होय, आम्ही भ्रष्टाचार केला आहे,” असे उदयनराजे यांनी ठणकावून सांगितले.
“स्वार्थ्याध भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. सहकाराचा गळा घोटून स्वाहाकार करुन आता रियल इस्टेटमध्ये घुसलेल्या व्यक्तींनी आजपर्यंत फक्त स्वार्थ पाहीलेला आहे. स्वार्थ नसेल तर त्यांचा कोणताही उपक्रम होत नाही, अश्या व्यक्तींना निस्वार्थीपणे नागरीकांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींची वाढती लोकप्रियता सहन होणारी नाही म्हणून त्यांची नेहमीच कुरकूर असते,” अशी टीका देखील उदयनराजे यांनी केली आहे.
चारित्र हननाचा प्रयत्न यशस्वी होणार नाही
उदयनराजे म्हणाले, “उदयनराजें हे नेहमीच समाजासाठी जगणारी व्यक्ती म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे. कुणी कितीही उलट्या बोंबा मारत असले तरी त्या बोंबा मारणाऱ्यांना समाजाने पुरते ओळखले आहे. शाश्वत विकासाच्या गप्पा ठोकणाऱ्यांनी चालवता आल्या नाहीत म्हणून दोन सहकारी बॅंकांचे विलिनीकरण केले. तरीही उजळ माथ्याने हिंडणाऱ्यांचा सहकारातील अचंबित करणारा शाश्वत विकास सभासद, नागरीकांनी पाहीला आहे. त्यांचे पोटात एक आणि ओठात एक या वैशिष्ठयाचा अनेकांना बसलेला झटका लोक विसरलेले नाहीत. म्हणून बेछुट, बेताल आरोप करुन, त्यांचा सुरु असलेला चारित्र हननाचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. आम्ही त्यांच्या वक्तव्याला फारशी किंमतही देत नाही. संबंधितांना तरीही आरोप करायचे असतील तर ते त्यांनी पुराव्यानिशी आणि चार-चौघात चर्चेला सामोरे जावून, सिध्द करुन दाखवावेत, असे आमचे आव्हान आहे. खऱ्याला मरण नाही हा सूर्य आणि हा जयद्रथ करायला आम्ही तयार आहे.”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

