🕒 1 min read
मुंबई – राज्यातल्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध अधिक कडक करणार असल्याचं राज्य शासनानं काल जाहीर केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात विविध क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली; त्यानंतर काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्बंधांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
या नव्या निर्बंधानुसार राज्यात आजपासून रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असेल; तर दिवसा जमावबंदी लागू असेल. सर्व मॉल्स, रेस्टॉरंटस बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खाद्यपदार्थांची घरपोच सेवा आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. शासकीय कार्यालयं ५० टक्के क्षमतेनं सुरू राहतील.
दरम्यान, खासगी कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी द्यावी असं सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर दर सप्ताहांती म्हणजे शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात संपूर्ण टाळेबंदी असेल असं शासनातर्फे सांगण्यात आलं. हे सर्व निर्बंध 30 एप्रिलपर्यंत लागू असणार आहेत.
दरम्यान,यासंदर्भात बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की कोरोना रूग्णांच्या संख्येत होणारी वाढ आणि कोरोनामुळे होणा-या मृत्यूची संख्या चिंतेचा विषय आहे. गेल्या वर्षभरापासून राज्य सरकार कोरोनाच्या संकटाशी पूर्ण शक्तीनिशी लढत आहे. या लढाईत केंद्र सरकारने राज्याला मदत तर दिलीच नाही उलट राज्याच्या हक्काचा जीएसटी परतावाही वेळेवर दिला नाही. केंद्राच्या मदतीशिवायही राज्य सरकार कोरोनाविरोधातील लढाई लढत आहे.
मधल्या काळात याचे चांगले परिणाम ही दिसू लागले होते. रूग्णसंख्या आणि मृत्यूदरही नियंत्रणात आला होता. त्यामुळे मिशन बिगीनच्या अंतर्गत सरकारने अनेक निर्बंध कमी केले व जनजीवन सुरळीत झाले होते. पण गेल्या काही दिवसांत पुन्हा मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या वाढू लागल्याने लॉकडाऊन लावण्याची मागणी केली जात होती. पण संपूर्ण लॉकडाऊन लावल्यास हातावर पोट असणा-या गोरगरिबांची, छोटे व्यापारी, कामगार, मजूर वर्गाची मोठी अडचणी झाली असती. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊन न लावता काही निर्बंध लावावेत ही जनभावना लक्षात घेऊन सरकारने आठवडाभर निर्बंध व आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील कोरोना रूग्णसंख्येला आळा घालण्यासाठी सरकार योग्य पावले उचलत आहे. लसीकरणही वेगाने सुरु आहे. केंद्र सरकारने कोरोना लसीकरणासाठीची वयाची अट शिथील करून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करायला परवानगी देऊन राज्याला लसीचा मुबलक पुरवठा करावा या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी केला. राज्यातील जनतेने प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. मास्क, सॅनिटायझरचा वापर व सोशल डिस्टन्शिंगच्या नियमांचे पालन करून सरकारला सहकार्य करावे असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केले.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक! बीड जिल्ह्यात रुग्णालय कर्मचारी-नातेवाईकांत हाणामारी
- उपचारात हलगर्जीपणा केल्यास खैर नाही, आ. मेघना बोर्डीकर यांचा सज्जड इशारा
- बीड जिल्हा; लॉकडाऊन उठविले, मात्र हॉटेल, रेस्टॉरंट बंदच
- लॉकडाऊन लावण्याची वेळ आली तर दोन दिवसांचा वेळ देऊ : अजित पवार
- पुण्यानंतर राज्यात ‘मिनी लॉकडाऊन’ ‘हे’ असणार कडक निर्बंध !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
