🕒 1 min read
औरंगाबाद : शहरातील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी होणार आहे. मात्र अनावरनाची वेळ मध्यरात्री १२ वाजताची ठेवण्यात आली होती. त्यामुळे रात्री १२ वाजेनंतर ढोलताशे व इतर ध्वनिक्षेपकांचा वापर करण्यावर बंदी असल्याने शिवप्रेमींनी नाराजी जाहीर करत अनावरणाची वेळ बदलण्याची मागणी केली होती. तर दुसरीकडे काल रात्री शिवजयंती शुभेच्छांचे बॅनर महापालिकेकडून काढण्यात आले. त्यामुळे मनसेने आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
या वादावर तोडगा म्हणून महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे (Municipal Commissioner Astik Kumar Pandey) यांनी महत्वपूर्ण भूमिका घेतली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन आता १२ ऐवजी १० वाजता होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र तरीही शिवप्रेमींमध्ये नाराजी दिसून येत असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, शिवजयंतीचे बॅनर काढण्याचे आदेश देणारा ‘तो’ शिवद्रोही अधिकारी कोण? अशा चर्चांना औरंगाबादमध्ये उधाण आलं आहे. यावर महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांना विचारले असता त्यांनी देखील मौन धारण केले. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा असल्याच्या भावना शिवप्रेमींनी व्यक्त केल्या आहेत. तसेच मनपा प्रशासक तथा मनपा आयुक्त शिवजयंतीवर गप्प असून राजकीय कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत, असा आरोप केला आहे.
दरम्यान महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात असताना देखील महाराजांचा पुतळा बसविण्यास तब्बल ३ वर्षांचा कालावधी लावत त्यांच्या मनात किती ‘शिवप्रेम’ आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ मतापुरता वापर करणारी शिवसेना या शिवस्मारक आणि पुतळ्याचे श्रेय लाटण्यासाठी जोरदार तयारीला लागली असल्याचे म्हटले जात आहे.
तर आज दुपारी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी याठिकाणी पाहणी करून रात्री होणाऱ्या अनावरणाच्या प्रकाराबद्दल खंत व्यक्त केली आहे. त्यामुळे औरंगाबाद महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात असतानाही सेनेकडून उदासीनतेची भूमिका घेतली जात असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.
आयुक्तांच्या निर्णयानंतर वादावर पडदा पडणार का?
दरम्यान पुतळा अनावरणाची वेळ, तसेच इतर निर्बंध याबाबत वाद- विवाद होत असतानाच महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन आता १२ ऐवजी १० वाजता होणार असल्याचे म्हटले आहे. तसेच या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित केले जाणार आहे. तर बॅनरमुळे झालेल्या वादावर तोडगा म्हणून बॅनर लावण्यासाठी महापालिका शिवप्रेमींना जागा उपलब्ध करून देणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
