नवी दिल्ली : भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रत्येक दिवशी नवीन वाढ होत आहे. दोन्ही इंधन किंमतींनी बऱ्याच शहरांमध्ये यापूर्वीच १०० रुपयांचा आकडा पार केला आहे.सुरूवातीला आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने इंधन दरवाढ होत असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर हिवाळा, कल्याणकारी योजना, कोरोना काळात झालेला खर्च याकडे बोट दाखवण्यात आले. आता केंद्रीय मंत्र्यांची गाडी काँग्रेसवर घसरली आहे.
काँग्रेसने २०१४ पूर्वी ऑईल बाँडच्या रुपाने आमच्यावर कोट्यावधी रुपयांचे कर्ज सोडले, त्यामुळे आता आपल्याला मूळ रक्कम आणि व्याज भरावे लागणार आहे. हे तेलाच्या किंमतीतील वाढीचे एक प्रमुख कारण आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. आपल्या आवश्यक असणारे ८० टक्के तेल बाहेरुन आयात करावे लागते असे, धर्मेंद्र प्रधान यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. केंद्र आणि राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलद्वारे प्राप्त झालेल्या करांचा उपयोग कल्याणकारी योजनांसाठी, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि विकास कामे करण्यासाठी करीत आहेत, असेही प्रधान म्हणाले.
तर दुसऱ्या बाजूला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार पेट्रोल डिझेलवर भरमसाठ कर लादून जनतेचे खिसे कापत आहे असा आरोप कॉंग्रेसकडून होत आहे.युपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहनसिंह यांनी इंधनाच्या महागाईची झळ लोकांना बसू नये म्हणून दर स्थिर ठेवून जनतेला दिलासा होता परंतु मोदी सरकार मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाचे भाव कमी असतानाही भरमसाठ कररुपाने लोकांच्या खिशावर दरोडे टाकून नफेखोरी करत आहे.
युपीए सरकार असताना पेट्रोलवर एक्साईज ड्युटी ९.४८ रुपये होती ती आज ३२.९० रुपये म्हणजे २५८ टक्के आहे तर डिझेलवर ३.५६ रुपये होती ती आज ३१.८० रुपये आहे म्हणजे ८२० टक्के वाढ. या एक्साईज ड्युटीतून मोदी सरकारने गेल्या ७ वर्षात तब्बल २० ते २५ लाख कोटी रुपयांची लुटमारी केली आहे. तसेच २००१ ते २०१४ या चौदा वर्षाच्या काळात पेट्रोल डिझेलवर प्रति लिटर १ रुपया सेंट्रल रोड फंड सेस लावला जात होता. २०१८ मध्ये याचे नाव तो १८ रु. प्रतिलिटर केला. सध्या पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर १८ रु. सेंट्रल रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंडासाठी घेतले जातात. तसेच पेट्रोलवर प्रति लिटर २.५० तर डिझेलवर प्रति लिटर ४ रुपये कृषी सेस घेतला जातो असे कॉंग्रेसकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या दोन पक्षांमध्ये नेमके खरे कोण बोलत आहे यापेक्षा जनतेला दिलासा कसा मिळेल यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. खरतर कोरोनाने दीड वर्षापासून लोकांचे उत्पन्न कमी झाले आहे, उद्योग धंदे बंद आहेत, लाखो लोकांचे रोजगार गेले, कठीण परिस्थितीत लोक जगत असताना त्यात इंधन दरवाढ व महागाईने लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे.आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहे एवढेच काय ते सत्य आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील ओबीसी नेत्यांच्या नाकावर टिच्चून होणार निवडणुका ?
- कालची बैठक म्हणजे जनाधार गमावलेल्या नेत्यांचा केवळ बातमीत राहण्यापुरता केविलवाणा प्रयत्न ?
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
- ‘जाणत्यां’ना या वयात हेही चवनप्राश, ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीवरून भातखळकरांनी उडवली खिल्ली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

