मुंबई : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर शिवसेनेनं भाजपसोबत दोन दशकांहून अधिक काळ असलेली मैत्री तोडली. यानंतर, शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. तर, सर्वाधिक आमदार येऊन देखील भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं आहे.
महाविकास आघाडी आल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली असून आता त्याचा परिणाम येणाऱ्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकांसह इतर स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये देखील होत आहे. कुठे या तिन्ही पक्षांमध्ये बेबनाव आहे तर कुठे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हातमिळवणी केली जात आहे. आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं मिळून भाजपला आणखी एक धक्का देण्याची योजना आखली आहे.
अहमदनगर महापालिकेत सध्या राष्ट्रवादीच्या पाठींब्याने भाजपचा महापौर आहे. त्यांची मुदत ३० जूनला संपत असून कोणत्याही क्षणी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. अशात भाजपकडे उमेदवार नसून शिवसेनेनं आणि काँग्रेसने याआधीच आपला उमेदवार जाहीर केला आहे. या निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची भूमिका महत्वाची मानली जात आहे.
कारण महापालिकेत शिवसेना २३, राष्ट्रवादी १९, भाजप १५, काँग्रेस ५, बसपा ४, सपा १ असे पक्षीय बलाबल आहे. तर एक जागा रिक्त आहे. तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वाद आहे. याचा फायदा भाजपला झाला होता. आता येत्या निवडणुकांमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येत असून ही नव्या युतीची नांदी असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी या युतीबाबत सकारात्मक विधाने केली होती.
मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून महापौर पदासाठी शिवसेनेचा उमेदवार देण्यावर एकमत झाले आहे. अहमदनगर शहरातील स्थानिक आमदारांसह दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. तर दुसरीकडे भाजपतर्फे माजी मंत्री राम शिंदे आणि आमदार शिवाजी कर्डिले यांनी महापौर निवडणुकीत काहीही झाले तरी भाजपच किंगमेकर ठरले, अशी भूमिका स्पष्ट केल्याने राजकीय घडामोडी पुन्हा रंगणार याची चाहूल लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
- अखेर अदर पुनावाला पुण्यात परतले; ‘वाय’ दर्जाची खास सुरक्षा तैनात
- ‘जाणत्यां’ना या वयात हेही चवनप्राश, ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीवरून भातखळकरांनी उडवली खिल्ली
- ‘सरकारच्या पाठपुराव्या अभावीच ओबीसी आरक्षण रद्द’, खा. भागवत कराड यांचा आरोप
- ‘काही लोक पुनर्विचार याचिकेबाबत ट्विटर वरून माहिती देतायत, हे काय गौडबंगाल ?’
- दिलासादायक : पिंपरी-चिंचवडमध्ये ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या १ हजाराखाली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

