मुंबई: गाणसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आवाज कायमचाच हरपला आहे. आज (६ फेब्रुवारी) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी (Lata Mangeshkar dies at 92) त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या २७ दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. लता दीदी यांना क्रिकेटशी फार लळा होता. त्यांचे सचिन तेंडुलकरवर (Sachin Tendulkar) असलेले मायेचे प्रेम सगळ्यांना माहिती आहे. त्या बऱ्याचदा भारतीय क्रिकेट मध्ये होणाऱ्या घडामोडींबद्दल ट्विटरद्वारे मत व्यक्त करायच्या. मात्र लता दीदी यांचा क्रिकेटशी संबंध जुना आहे. त्यांनी १९८३ चे विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाला मदत करण्यासाठी फ्री कॉन्सर्ट केला होता.
कपिल देवच्या (Kapil Dev) नेतृत्वात भारतीय संघाने १९८३च्या विश्वचषकाच्या (World Cup) अंतिम फेरीत बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव केल्यानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला संघाचा सत्कार आणि सन्मान करायचा होता. मात्र, तेव्हा बीसीसीआयकडे (BCCI) त्यासाठी पुरेसा निधी नव्हता. तेव्हाचे बीसीसीआय अध्यक्ष राजसिंग डुंगरपूर मदतीसाठी लतादीदींकडे गेले होते. राज सिंह यांनी लता मंगेशकर यांना सत्काराचे पैसे जमवण्यासाठी दिल्लीत कॉन्सर्ट करायची विनंती केली. कारण त्या काळात बीसीसीआयकडे निधी नव्हता. लता दीदींनी विनंती स्वीकारत दिल्लीत कॉन्सर्ट केले. ज्यात केवळ याच नव्हे तर सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांनीही त्यांना साथ दिली. त्या शोमध्ये राजीव गांधीही उपस्थित होते.
लतादीदींचे संगीतकार भाऊ पंडित हृदयनाथ मंगेशकर (Pt. Hrudaynath Mangeshkar) यांनी संगीतबद्ध केलेले एक खास गाणे हे या मैफिलीचे वैशिष्ट्य ठरले होते. ‘भारत विश्व विजेता’ हे गाणे क्रिकेटपटूंनीही मंचावर गायले. शेवटी, मैफिलीने २० लाख रुपये कमवले. जे प्रत्येक खेळाडूला एक लाख मिळण्यासाठी पुरेसे होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी लता दीदींनी कोणतेही मानधन घेतले नाही. आज त्यांच्या निधनाने केवळ सिनेसृष्टी नव्हे तर क्रिकेट जगतही हळहळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
रसिकांना अपार सांस्कृतिक श्रीमंती देणार्या लतादीदींच्या जाण्याने अलौकिक पर्वाची सांगता-सतिश चव्हाण
‘सत्यम शिवम सुंदरम’ चित्रपटासाठी राज कपूर यांची लता मंगेशकरांना होती पहिली पसंती
कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले-खा. सुप्रिया सुळे
‘रसिकांची मैफिल सुनी करून दीदी गेली’; मनीषा कायंदे यांनी व्यक्त केल्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

