🕒 1 min read
औरंगाबाद : राज्य सरकारच्या एका महत्त्वाच्या जीआर म्हणजेच शासन निर्णयावर ‘औरंगाबाद’च्या अगोदर ‘संभाजीनगर’ असा उल्लेख केला गेला आहे. जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषदेत सरकाकडून औरंगाबादच्या राम भोगले यांची निवड करण्यात आली. यावेळी सरकारकडून काढण्यात आलेल्या जीआरवर त्यांच्या नावासमोर संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आलाय.
या उल्लेखानंतर एमआयएम पक्षाचे नेते तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील चांगलेच भडकले आहेत. त्यांनी हिंमत असेल तर शहराचे नाव बदलून दाखवा असं थेट आव्हान दिलं आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी हे परिपत्रक काढलं त्याने राजीनामा द्यावा अशी मागणी जलील यांनी केली आहे. निवडणूक आली की हे धंदे सुरू होतात. ज्या अधिकाऱ्याने या जीआरवर सही केली त्यांना बडतर्फ करावे. तूम्ही तुमच्या मर्जीनुसार शहराचं नाव बदलू शकत नाही. सरकार तुमचं आहे, हिम्मत असेल तर करून दाखवा असा इशारा जलील यांनी दिला आहे.
जलील यांच्या या आव्हानानंतर शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पलटवार केला आहे. ‘औरंगाबाद शहराचं नाव आधीच बदललं आहे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या दिवशी घोषणा केली त्याच दिवशी नाव बदललं, आता फक्त सोपस्कार बाकी राहिला आहे. इम्तियाज जलील काहीही बोलतो, हिंमत असेल तर मैदानात येऊन दाखवावं, आम्ही या शहराचं नाव बदलणारच, असे प्रत्युत्तर चंद्रकांत खैरे यांनी दिले आहे.
काय आहे प्रकरण?
औरंगाबाद शहराच्या नावावरुन मागील कित्येक वर्षांपासून मोठा वाद आहे. शिवसेना तसेच भाजपसारखे हिंदुत्ववादी पक्ष औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करतात. तर काँग्रेससारख्या पक्षाने औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याला विरोध केलेला आहे. फक्त शहराचे नाव बदलण्यापेक्षा पायाभूत सुविधांचा विकास व्हावा अशी भूमिका काँग्रेससारख्या पक्षांनी घेतलेली आहे. या पार्श्वभूमीवर आता एक वेगळाच प्रकार समोर आला आहे.
औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्यासाठी शासन स्तरावरही औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रस्ताव पाठवून हालचाली केल्या होत्या. मात्र आता थेट शासनाच्या ‘जीआर’वरच संभाजीनगरचा उल्लेख करण्यात आला आहे. राज्य शासनाने राज्य जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषदमध्ये उद्योजक राम भोगले यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड केली आहे. त्याचा जीआर सरकारने काढला आहे. त्या जीआरमध्ये राम भोगले यांच्या नावासमोर संभाजीनगर आणि नंतर औरंगाबाद असा उल्लेख केला आहे. त्यामुळे कागदोपत्री संभाजीनगर असे नामकरण होतंय का?, या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अमित शहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने सारा सोशल मीडियावर ट्रोल
- ‘दिल्लीत कधीकधी डोमकावळ्यांची फडफड बघतो, पण…’, संजय राऊतांचा घणाघात
- भारत-पाकिस्तान सामना भारतात आयोजित करणे खूप कठीण : सौरव गांगुली
- ‘भाजपच्या लोकांनीही कारखाने विकत घेतले, कोणाकोणावर आरोप करतात ते बघूच’, पटोलेंचा सूचक इशारा
- औरंगाबादेत प्रत्येक वॉर्डात पालक अधिकारी; आतातरी समस्या सुटतील का चुटकीसरशी?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
