पुणे : गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंबीयांवर आयकर विभागाने सलग ६ दिवस टाकलेल्या छाप्यांची देखील जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषत: जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना मातीमोल किंमतीला विकला गेल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आल्यानंतर त्यावरून अजित पवार आणि त्यांच्या कटुंबीयांवर निशाणा साधण्यात आला आहे. या सर्व प्रकरणावर अजित पवारांनी तब्बल ६४ सहकारी साखर कारखाने आणि एका सूत गिरणीची यादीच त्यांनी समोर ठेवली आहे. जरंडेश्वर कारखान्याविषयी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावत या ६५ व्यवहारांविषयी कुणीच काहीच का बोलत नाही, असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
या प्रकरणावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भाजपावर टीका केली आहे. ‘साखर कारखाने भाजपाच्या लोकांनीही विकत घेतले आहेत. कोणाकोणावर आरोप करतात ते बघूच. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार जे बोलले त्याला काँग्रेसचे पूर्ण समर्थन आहे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. पुणे येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले की, भाजपाला सत्तेची गुर्मी चढली आहे. देशात कोरोनाने थैमान घातले. अनेकांच्या घरातील कर्ते पुरूष गेले. असे असताना पंतप्रधान पदावरील व्यक्ती लसीकरणाचे सेलिब्रेशन करत असेल तर दुर्दैवी आहे. कोरोनावर त्यांना प्रभावी ऊपाय करता आले नाहीत, उपचारांमध्येही भ्रष्टाचार केला. लक्ष दुसरीकडे वळवायचे म्हणून असले उद्योग त्यांना सुचतात.
दरम्यान, कोणतीही निवडणूक जवळ येते तेव्हा भाजपकडून अशा प्रकारच्या घटना घडवल्या जातात. जसे की आता आर्यन खान प्रकरण घडले. याद्वारे भाजपकडून हिंदू आणि मुस्लिमांचे विभाजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर येथे केला होता. गुजरातमधील मुंद्रा पोर्टवर २१ हजार कोटींचे ड्रग्ज मिळाले आहे. त्याबद्दल भाजप नेते काहीच कसे बोलत नाहीत? हे पोर्ट कुणाच्या मालकीचे आहे? एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज भारतात का आणण्यात आले? याची चौकशी केली का जात नाही? , असा सवालही त्यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री सावरकरवादीच, कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर…- संजय राऊत
- ‘कोरोनामुळे जीव गमावलेल्या ४.५३ लाख कुटुंबीयांना माफीनामा लिहून द्या’, ‘काँग्रेस’ची मागणी
- भारत-पाक सामन्यापूर्वी BCCI ने उचलले मोठे पाऊल, ‘या’ चार खेळाडूंना दिले मायदेशी परतण्याचे आदेश
- ‘नक्षलवाद आणि दहशतवादाइतकेच गांभीर्याने अमली पदार्थाच्या तस्करीत लक्ष द्यावे’
- WhatsApp ही विदेशी कंपनी, भारतीय कायद्याला विरोध करु शकत नाही; केंद्र सरकारचे खडेबोल


