अतिक शेख : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या शहीद काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानाची आठवण पुन्हा आता मराठा समाजाकडून केली जात आहे. मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली आणि आता जनतेमध्ये पुन्हा असंतोष वाढायला लागला आहे. सध्याचं महाविकासआघाडी सरकार आरक्षणाचा पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात कमी पडलंय का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की हुतात्मा काकासाहेब शिंदेंचं बलिदान या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे व्यर्थ जाईल का ?
ज्या पद्धतीने त्यांच्या बलिदानानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळालं, कित्येक मराठा तरूणांना याचा फायदाही झाला. पण आता पुढे काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढील काळात मिळतीलच पण आम्ही आता याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हुतात्मा काकासाहेब शिदेंच्या गावी म्हणजेच औरंगाबादमधील कानडगावात काही लोकांची याबाबत त्यांची काय मतं आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
हुतात्मा काकासाहेब शिदें आणि त्यांचे बंधू अविनाश शिंदे मराठा आरक्षणाबाबत बोलताना म्हणाले की, मा. सर्वोच्च न्यायालयावर आमचा पुर्ण विश्वास आहे परंतु आरक्षणाचा लढा गेल्या ३० वर्षापासुन चालु आहे, यात माझ्या भावासहीत ४१ जनांनी बलिदान दिले, तसेच अनेकांच्या घराची राख रांगोळी झाली. अनेक मराठा युवकांवर गुन्हे दाखल झालेले आहे. दोन वर्षीपुर्वी मराठा समाजाचा आरक्षणासाठी जो आक्रोश पहायला मिळाला त्या गोष्टीचं गांभिर्य लक्षात घेऊन मा. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणच्या स्थगिती बाबत फेरविचार करावा व मराठा समाजाला न्याय द्यावा. आम्ही या आधीच खूप काही गमावल आहे आता आमचा अंत बघितला जाऊ नये. आम्ही खूप संघर्ष केला आहे. आरक्षणही मिळाल पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षण स्थगितीने आम्ही निराश आहोत.
काकासाहेब लहानपणापासून ज्यांच्या सोबत राहिले, खेळले एकत्र क्रांतीची मशाल उचलली असे त्यांचे मित्र सतीश दंडे म्हणतात, आम्हाला सरकारवर विश्वास आहे. सरकार अध्यादेश काढून आरक्षण पुन्हा आरक्षण द्यावं. अनेक विद्यार्थ्यांनी ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी एसईबीसी गटातून प्रवेश फॉर्म भरलेले आहेत. आरक्षण स्थगित झाल्यामुळे नक्कीच त्यांचे हक्क डावलले जाणार आहे. गुणवत्ता असूनसुद्धा खुल्या प्रवर्गातून त्यांना स्पर्धा करावी लागणार असल्याने सर्व हताश निराश आहेत. राज्य सरकारने अधिक गांभीर्याने अधिक जोरकसपणे आपली बाजू न्यायलयात मांडावी. केंद्र सरकारनेसुद्धा घटनात्मक तरतुदी करणे आवश्यक आहे.
तर, काकासाहेबांसोबत कायगाव टोका येथे आंदोलनात त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे असलेले योगेश दंडे म्हणतात कि, मराठा समाजाला डावललं जातंय अशी भावना मनामध्ये तयार होत आहे. महाराष्ट्रात मराठा समाज मागास आहे असे प्रबळ पुरावे असताना देखील त्यावर स्थगिती आली. सरकारने दिलेले आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षण घटनापिठाकड दिलं जात असताना त्यात घटनात्मक तरतुदी करून त्यावर स्थगिती आणली जात नाही. अनेक राज्यांमध्ये घटनात्मक तरतुदी करून ५० टक्के यावर आरक्षण आहेच की, तिथे स्थगिती नाही.
मग हा एका राज्यावर दुजाभाव नाही तर काय आहे? मराठा समाजाला डावललं जातंय, अशी भावना मनामध्ये निर्माण होत आहे. बंधू काकासाहेब शिंदे यांनी प्रचंड मोठा त्याग केला आहे. त्यांनी आरक्षण मिळवून देण्यासाठी समाजासाठी बलिदान दिलं. समाजासाठी दिलेलं बलिदान कधीही व्यर्थ गेलेलं नाही असा इतिहास आहे या भूमीचा म्हणून काकासाहेब यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. आरक्षण मिळेपर्यंत कायदेशीर लढा देऊ असं सध्या वैद्यकीय शिक्षण घेत असलेले योगेश दंडे यांनी म्हटलंय.
तर, काकासाहेब यांच्या अत्यंत जवळचे मित्र असणारे अमोल तनपुरे यांना आपल्या भावना अनावर आल्या, यापुढे समाज रौद्र रूप धारण करेल वेळप्रसंगी रक्तपात होऊ शकतो हे ध्यानात असू द्यावे. असा गंभीर इशाराच त्यांनी सरकारला दिला आहे. तनपुरे पुढे म्हणतात, आरक्षण हा आमचा हक्क आहे आणि त्यासाठी आम्ही लाखोंच्या संखेने मुकमोर्चे काढले. मागास वर्ग आयोगाने उच्च न्यायालयात सिद्ध केलं आहे की समाज आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयात बाजू व्यवस्थित न मांडल्यामुळे न्यायालयाने स्थगिती दिली मराठा समाजाने देशासाठी खूप योगदान दिलं आहे.
यामध्ये जो कोणी राजकीय पक्ष असेल किवा कोणाचं षडयंत्र असेल तर मराठा समाज कदापि माप करणार नाही. मराठा समाजाची आणि माझी अशी भूमिका आहे की राज्यसरकारने तातडीने नव्याने अध्यादेश काढावा व आरक्षणासाठी जे काही करावं लागेल ते करावं. जर का अस नाही झाल तर यानंतर समाज रौद्र रूप धारण करेल वेळप्रसंगी रक्तपात होऊ शकतो हे ध्यानात असू द्यावे.काकासाहेब शिंदे च बलिदान कदापि व्यर्थ जाऊ देणार नाही. काकासाहेब शिंदे ची प्रेरणा आम्हाला लढायला अजून ऊर्जा देते. असं मत अभियंते अमोल तनपुरे यांनी व्यक्त केलं.
जातीने मराठा नसणारा सचिन चिंतामणी आपल्या मित्राच्या हक्काच्या लढाईत सर्वात पुढे होता. जीवाला जीव देणारा मित्र काकासाहेब शहीद झाला पण त्याच्या या बलिदानाचा सन्मान मायबाप सरकार करणार का ? असा सवाल सचिनच्या मनात नेहमी येतो. याविषयी तो ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना म्हणाला आरक्षणाला स्थगिती मिळण है संपूर्ण मराठा समाजावर झालेला अन्याय आहे यात काही शंका नाही. समाजाने शांत पद्धतीने मोर्चे काढले (दुसऱ्या देशांनीसुद्धा याची दखल घेतली ) शांत पद्धतीने लढा दिला आणि शेवटी समाजावरच अन्याय झाला.
शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षणाला स्थगिती महत्वाचा मुद्दा असा की आम्हाला यामध्ये आरक्षण असणे महत्त्वाचे आहे. आरक्षणाचा खरा अर्थ 1,2 मार्क वरून फेल झालेल्या विद्यार्थ्यांना विचारा मग तुम्हाला समजेल. रात्र दिवस एक करून अभ्यास करून शेवटी 1,2 मार्कने फेल होतो ना तेव्हा समजत आरक्षण काय आहे ते. एक ढ विद्यार्थी हुशार ला मागे टाकतो तेव्हा समजत आपल्याला जात नडली. आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे तेव्हा कुठं समाजाची प्रगती होईल. तर आमच्या भावाने मराठा आरक्षणासाठी पहिलं बलिदान दिल ते सरकारने व्यर्थ होऊ देऊ नये व आमच्या भावाला न्याय मिळून द्यावा,हीच गावकरी म्हणून माझी अपेक्षा आहे. अशी भूमिका कृष्णा दंडे यांनी मांडली.
वेगवेगळ्या पद्धतीने गावातील लोकांशी संवाद साधल्यानंतर आम्हाला असं कळलं की काकासाहेब शिंदेंचे कुटुंबीय आणि गावातील नागरिक मराठा आरक्षणाच्या स्थगितीने निराश झालेले आहेत. सर्वांना महाविकास आघाडी कडून अध्यादेशाची अपेक्षा आहे. आता या प्रकरणी राज्यात राजकारण तापत आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती यात मराठा आरक्षणाविषयी चर्चा झाली. आता महाविकासाआघाडी सरकार अध्यादेशावर काय निर्णय घेते हे बघणं महत्वाचं आहे. नाहीतर आता महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे.
महत्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करणाऱ्या कंगणावर फराह खान संतापली तुझी हिम्मत कशी झाली….
अंतरिम स्थगितीची गरज नव्हती; मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढाई लढणार – उद्धव ठाकरे
श्रीरामपूरकरांचा जनता कर्फ्यूला उदंड प्रतिसाद
ये बात ! ‘पुष्पम प्रिया चौधरी’ जिया हो बिहार की बेटी
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी-रामदास आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

