नवी दिल्ली : जगभरात खळबळ उडवून देणारी एक घटना आता घडली आहे. अफगाणिस्तान आता पूर्णपणे तालिबानच्या ताब्यात आले आहे. तालिबान रविवारी काबूलमध्ये दाखल होताच अफगाणिस्तान सरकारने त्यांच्याशी करार करण्यास सहमती दर्शविली आहे. अफगाणिस्तानमधील वाढतं तालिबानचं वर्चस्व पाहता हा निर्णय त्यांनी घेतला असल्याचं सांगितलं जात आहे. आता अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरादर बसणार आहे.
१५ ऑगस्ट २०२१ रोजी भारतात स्वातंत्र्याचा जल्लोष सुरू होता तेव्हा तालिबानचे सैनिक काबुल ताब्यात घेत होते. अफगाणिस्तानात सध्या तणावाची परिस्थिती बनली आहे. तालिबानकडून अफगाणिस्तानवर ताबा मिळविण्यात येत आहे. दरम्यान एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार तालिबानकडून भारतासोबतच्या संबंधावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. तालिबानचे प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद यांनी भारतासोबत चांगले आणि मजबूत संबंध हवेत, असे म्हटलं आहे.
तसेच, अफगाणिस्तानात भारतातील उच्चायुक्तालयाचे अधिकारी सुरक्षित असून कुणालाही देश सोडून जाण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादात तालिबानचा कुठलाही हस्तक्षेप असणार नाही. दोन्ही देशांमधील समस्या ही त्यांची स्वत:ची आहे. त्यामुळे, यात हस्तक्षेप असणार नाही, असेही तालिबानकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान सध्या काबूलमध्ये तालिबान घुसल्याच्या वृत्तांमुळे तणावही वाढत आहे. विशेष म्हणजे तालिबान लढाऊंनी जलालाबाद आणि मजार-ए-शरीफ सारख्या शहरांवर आधीच कब्जा केला आहे. काबूल व्यतिरिक्त जलालाबाद हे एकमेव मोठे शहर होते जे तालिबानच्या पकडण्यातून वाचले. गेल्या आठवड्यात तालिबानने अफगाणिस्तानचा मोठा भाग ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तानच्या केंद्र सरकारवर दबाव वाढला आहे आणि आता तालिबान शेवटी अफगाणिस्तानच्या आत सत्तेत परतताना दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- लाल किल्ल्यावरुन मोदींनी पुन्हा फेकाफेकी केली, सचिन सावंतांची घणाघाती टीका
- मनपाचा ई -व्हेईकलस खरेदी करण्याचा मानस
- ‘आजपासून २५ वर्षांनी जे कोणी पंतप्रधान असतील…’
- ‘मला अजितदादाही १२ आमदारांबद्दल बोलत नाहीत, तुम्ही कोण विचारणारे?’ राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले
- ‘जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका’, स्वातंत्र्यदिनी मोदींची मोठी घोषणा


