पुणे – गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात मोठे नुकसान होत असताना आता शाहीन चक्रीवादळाचं संकट घोंगावत असल्याचे चित्र आहे. राज्यावर अरबी समुद्रात शाहीन चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवल्यानं पालघर, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांना रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे. राज्य आणि जिल्ह्यांच्या आपत्कालिन मदत यंत्रणांनी सतर्क आणि परस्परांच्या संपर्कात राहून आपत्तीग्रस्तांसाठी बचाव आणि मदतकार्य तात्काळ सुरु करावे, अशा सूचनाही सर्व जिल्हा आपत्कालीन मदत यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, गुलाब चक्रीवादळ ओसरल्यानंतर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत सोमवारपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गुलाब चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभावामुळे येत्या 24 तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भ मराठवाडा सीमेवरील ईसापूर धरणाचे 12 दरवाजे उघडल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात पैनगंगा नदीला पूर आला असून, कयाधु नदीचे पाणी पैनगंगेला मिळाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पुसद उपविभागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मार्लेगाव पुलावर पाणी पोहोचल्यानं धोका लक्षात घेऊन मार्लेगाव पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
दरम्यान, खोपोली इथल्या झेनिथ धबधब्यात काल संध्याकाळी दोन महिला आणि एक मुलगी वाहून गेल्याची घटना घडली .दोन महिलांचे मृतदेह हाती लागले असून मुलीचा शोध अद्याप लागलेला नाही. काल दुपारी हे पर्यटक झेनिथ धबधब्यावर आले असता , धबधब्यातल्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने हे पर्यटक वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मांजरा नदीच्या पुरात अडकलेल्या तिघांना हेलिकॉप्टरच्या सह्याने सुखरूप बाहेर काढले
- ‘गोव्यात शिवसेना विधानसभेच्या २२ जागा लढवणार’, संजय राऊतांची घोषणा
- किती नौटंकी करणार शिवसेना? किती चुना लावणार लोकांना? भाजप आमदाराने उडवली खिल्ली
- भावना गवळींना ईडीचे समन्स; 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
- नवज्योत सिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याबाबत मला काहीच माहिती नाही – चरणजीतसिंग चन्नी


