प्रदीप मुरमे : निलंगा तालुक्यातील माळेगाव येथील शेतक-याची पपईची बाग अवकाळी पावसात पुरती उध्वस्त झाल्याने शेतक-याला तब्बल ५ लाख रुपयाचा फटका बसल्याने अर्थकारण कोलमडले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,माळेगाव येथील दत्तात्रय शेषराव आरीकर या शेतक-याची सिंगनाळ शिवारात शेती असून यामध्ये २ एकर पपईची बाग असून २ हजार झाडे आहेत.बाग पूर्णपणे पपईने लखडली होती.
दरम्यान गुरुवारी सायंकाळी जोरदार वादळी वा-यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे बागेचे अतोनात नुकसान झाले आहे.झाडाला लखडलेल्या पपया जमिनीवर पडल्याने या शेतक-यावर मोठे अस्मानी संकट कोसळले आहे.या आर्थिक फटक्यामुळे शेतकरी पुरता कोलमडून गेला आहे. दोन एकर बागेमध्ये ३५ ते ४० टन पपईचे उत्पादन होणार होते. या पावसाने आपले अंदाजे ५ लाख रुपये नुकसान झाल्याचे दत्तात्रय आरीकर यांनी सांगितले. लाॕकडाऊनमुळे पपईची विक्री करण्यात आली नव्हती.लाॕकडाऊन उठल्यानंतर बागेतील माल विकण्यात येणार होता.
परंतु अवकाळी पावसाचा आम्हाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.या आर्थिक संकटाला तोंड देणे अतिशय अवघड आहे.तरी संबंधित अधिका-यांनी बागेच्या नुकसानीचा तत्काळ पंचनामा करुन शासकीय आर्थिक नुकसान भरपाई देवू करावी अशी मागणी या शेतक-याने प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

