मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भविष्यात पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्यावीत, अशा शुभेच्छा राहुल शेवाळे यांनी दिल्या आहेत.
दक्षिण आणि उत्तरेतील राज्यांतील जनतेला आपलेसे वाटू शकेल असे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांचे असल्याने, ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे तमाम मराठी जनतेचे स्वप्न साकार करावे. त्यांनी भविष्यात पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घ्यावीत, अशी सदिच्छा राहुल शेवाळे यांनी व्यक्त केली.
उत्तम छायाचित्रकार असल्याने नेमका कोणता क्षण टिपायचा आणि चांगले नेमबाज असल्याने नेमका निशाणा कुठे आणि कधी साधायचा? याचा अचूक अंदाज उद्धव ठाकरे यांना आहे. कोरोना संकटात महाराष्ट्राची उल्लेखनीय कामगिरी आणि त्याची विविध यंत्रणांनी घेतलेली दखल याविषयी राहुल शेवाळे यांनी उल्लेख केला आहे.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकाला आपला कुटुंब प्रमुख वाटतात. हे त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे. घरातला माणूस नेतृत्व करतो, असं प्रत्येकाला वाटतं. हे नेतृत्व प्रदीर्घ काळ टिकेल. राष्ट्रालाही त्यांच्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वावादी नेतृत्वाची गरज आहे. ते देशाला नेतृत्व देतील, अशा शुभेच्छा मी त्यांना देतो, असं ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्यात देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. ते देशाला निश्चितच नेतृत्व देतील, असं देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील नेता देशाचं नेतृत्व करत असेल तर आम्हाला आनंदच आहे, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांना शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विधानावर विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्हाला आनंद आहे. महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती राष्ट्रीय लेव्हलवर नेतृत्व करण्यासाठी पुढे येत असेल आणि लोकांचं समर्थन मिळत असेल तर आम्हाला आनंदच आहे, असं पवारांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री ठाकरेंना दिल्या पंतप्रधान मोदींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले…
- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले विधान दुर्दैवी
- आसाम मिझोराम सीमावादातून हिंसाचार, आसामच्या 6 पोलिसांचा मृत्यू
- ‘शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत रिंग रोडची मोजणी करून देणार नाही’
- ‘मुंबई इंडियन्स ते कसोटी संघात स्थान’ अवघ्या पाच महिन्यात बदलली सुर्याचे कारकिर्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
