🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून आज पाकिस्तानला फटकार मारण्यात आली आहे. कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबत व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भारत सरकारच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानने घेतलेल्या व्यापारी संबंध तोडण्याच्या निर्णयावर शिवसेनेने पाकिस्तान अजून यापेक्षा काय करू शकत होते असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या राज्यसभेतील भाषणाचे पोस्टर पाकिस्तानात लागले होते. या सर्व प्रकरणावर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे.
वाचा सामनाचा अग्रलेख…
पाकिस्तानने हिंदुस्थानशी असलेले व्यापारी आणि राजनैतिक संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान यापेक्षा दुसरे काय करू शकत होते? त्या देशाचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अशीही धमकी दिली आहे की, कश्मीरातील 370 कलम हटवल्यामुळे ‘पुलवामा’सारख्या घटना पुन्हा घडू शकतात. इम्रान खानचे हे वक्तव्य गंभीरपणे घ्यायला हवे. याचा सरळ अर्थ असा की, पुलवामातील हिंदुस्थानी जवानांवरील हल्ल्यामागचे सूत्रधार पाकिस्तान होते.
पण एक बरे झाले, या दुःखद घटनेतून हिंदुस्थानच्या रगात राजकीय इच्छाशक्ती निर्माण झाली व त्यातूनच कश्मीरातून आता 370 कलम हटवायलाच हवे या विचारांना बळ मिळाले. वाईटातून कधी कधी चांगले घडते. 40 जवानांच्या बलिदानातून जो अंगार देशात उफाळून आला त्यात 370 कलमाची राख झाली. पाकिस्तानने आता हे मान्य केले पाहिजे की, आमच्या दृष्टीने कश्मीरचा प्रश्न संपला आहे व विषय राहिला आहे तो पाकने बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवलेल्या कश्मीरविषयी. तो विषय लवकरच निकाली लागेल.
अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार होत आहे व हा वारू आता कोणीही अडवू शकत नाही. 370 कलमाचा खात्मा केल्यावर इस्लामाबादच्या रस्त्यांवर शिवसेनेची पोस्टर्स व बॅनर्स झळकले. याचा अर्थ असा की, पाकडय़ांच्या हद्दीत शिवसेना घुसली आहे. लवकरच हिंदुस्थानी सेनाही घुसेल व तसे संकेत गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. त्यामुळे इम्रान खान आता जी आदळआपट करीत आहेत त्यातून काय निष्पन्न होणार? पाकिस्तान हिंदुस्थानशी संबंध तोडत आहे याचा सगळय़ात जास्त फटका त्यांनाच बसणार आहे. इस्लामाबादेतील हिंदुस्थानी राजदूतांना परत पाठवले जाईल व पाकिस्तानी राजदूतांना हिंदुस्थानातून माघारी बोलावले जाईल.
खरे तर अनेक वर्षांपासून शिवसेनाच ही मागणी करीत होती की, हिंदुस्थानातील पाक दूतावासांना टाळे लावा, कारण पाक दूतावासातूनच येथील फुटीरतावाद्यांना सर्व प्रकारचे बळ मिळत आहे. कश्मीरमधील अतिरेक्यांचे पोशिंदे हे दिल्लीतील पाक दूतावासात येतात व हिंदुस्थानविरोधी कारस्थाने करतात हे लपून राहिलेले नाही. केंद्र सरकारने कश्मीरमध्ये कठोर पावले उचलल्यावर पाकने त्यांचे दूतावास आता बंद केले. अर्थात, त्यांनी ते बंद केले नसते तरी दिल्लीतील पाकी राजदूतांना पळून जावे लागले असते इतका येथे संताप उसळला आहे.
मुळात उभय देशांत तसे कोणतेही भावनिक संबंध राहिलेले नाहीतच. पाकिस्तानी अतिरेक्यांनी जानेवारी 2016 मध्ये पठाणकोट येथील लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानशी आधीच राजनैतिक पातळीवरील संवाद थांबवला आहे. चर्चा आणि घातपात एकाच वेळी होणे शक्य नाही असा हिंदुस्थानचा पवित्रा आहे. पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानात घुसून त्यांच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले व आता कश्मीरातील 370 कलम हटवून पाकिस्तानचा कोथळाच बाहेर काढला. पाकिस्तानने आता फार पचपच करू नये. यातच त्यांचे हित आहे.
हिंदुस्थानशी व्यापार तोडून त्यांनी काय मिळवले? पाकिस्तानात असा कोणता महान उद्योग बहरला आहे की त्यातून दोन देशांतील आयात-निर्यातीस चार चांद लागले आहेत. पाकिस्तान आजही गावंढळ पद्धतीनेच जगत आहे व दहशतवाद्यांचे गट तेथील खरे राज्यकर्ते आहेत. मात्र हिंदुस्थान सरकारने कश्मीरातील 370 कलम हटवून कश्मीरचे विभाजन केल्याने तो संपूर्ण भाग केंद्रशासित झाला आहे. यामुळे ‘हुरियत’ छाप नेत्यांची दुकानदारी बंद झाली आहे. पाकिस्तानच्या हिंदुस्थानद्वेषावर तरारलेल्या राजकारणावर पाणी पडले. चर्चेची आता गरज नाही.
अमित शहा यांनी कश्मीरात पहिले पाऊल टाकले व दुसरे पाऊल पाकव्याप्त कश्मीरात पडेल हे नक्की. हिंदुस्थानच्या भूमीवर आमचाच कायदा चालेल. त्यासाठी पाकडय़ांना, अमेरिकेला आणि बिनदाताच्या युनोला विचारण्याची गरज नाही. अमेरिकेचे प्रे. ट्रम्प म्हणतात, कश्मीरातून 370 कलम हटवताना त्यांच्याशी चर्चा केली नाही. बरोबर आहे. यालाच देशाचे सार्वभौमत्व म्हणतात! इराकचा घास गिळताना व सद्दाम हुसेन यांना फासावर लटकवताना अमेरिकेने हिंदुस्थानला विचारले होते काय?
कश्मीर तर आमचेच आहे, आमचेच राहणार, म्हणून तर 370 कलम हटविल्याच्या विजयपताका शिवसेनेच्या रूपाने इस्लामाबादच्या रस्त्यावर फडकल्या. पाकिस्तानने आता गप्प राहावे हेच बरे. हिंदुस्थानशी व्यापारी आणि राजनैतिक संबंध तोडण्याच्या गोष्टी सांगताय कुणाला? हा धोंडा तुम्हीच तुमच्या पायावर पाडून घेतला आहे. त्याबद्दल पाकडय़ांचे त्रिवार अभिनंदन केले पाहिजे!
कलम ३७० बाबत आज भारताने काश्मीरला दगा दिला : फारुख अब्दुल्ला
कलम ३७० हटवण्याचा निर्णय भारतासाठी विनाशकारी ठरेल; मेहबूबा बरळली
‘या’ कॉंग्रेस नेत्याने धरली भाजप ऐवजी वंचित आघाडीची वाट
कलम 370 हटवल्यानंतर मोदींची होतेय शिवरायांशी तुलना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
