मालेगाव : देशभरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत असून याबाबत महाराष्ट्र सर्वात पुढं आहे. देशातील काही राज्यांमध्ये नव्या कोविड रुग्णांच्या संख्येत प्रतिदिन मोठी वाढ होण्याचा कल कायम आहे. राज्यात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात तब्बल २५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. मात्र तरी देखील अनेक नागरिक कोरोनाच्या नियमनाचे पालन करताना दिसत नाही. लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
मालेगावात तर भयानक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चित्रपट बघण्यासाठी शेकडो लोकांनी चित्रपटगृहाबाहेर तुफान गर्दी केली. या चित्रपटगृहाचे दरवाजे बंद होते. जेव्हा या चित्रपटगृहाचे दरवाजे उघडले तेव्हा शेकडो लोक युद्ध जिंकल्यासारखे चित्रपटगृहात शिरताना दिसले. काही तरुण तर एकमेकांच्या उरावर चढून थिएटरमध्ये जाताना दिसले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्या मध्ये कैद झाला आहे.
मालेगावात मोहन नावाच्या चित्रपटगृहाबाहेर लोकांनी आज मोठी गर्दी केली होती. या चित्रपटगृहात शिरण्यासाठी लोक प्रचंड उतावीळ झालेले बघायला मिळाले. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार घडत असताना कुणाच्याही तोंडावर मास्क नव्हता. याशिवाय लोकांमध्ये डिस्टन्स तर अजिबात नव्हते. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ समोर आलाय.
मोहन टॉकीजच्या गेटजवळ तुफान गर्दी होती. असं असताना दोन तरुण चित्रपटगृहाचे दरवाजे उघडावीत म्हणून थेट लोखंडी दरवाजावर जाऊन चढतात. ते दरवाज्यावर इकडून तिकडे फिरत असतात. थोड्या वेळाने चित्रपटगृहाचा दरवाजा उघडतो. त्यानंतर प्रचंड गदारोळ बघायला मिळाला.
काही तरुण तर लोकांच्या खांद्यावर चढून आतमध्ये शिरायला जातात. या सर्व प्रकरणाचा व्हिडीओ समोर आला आहे. आता प्रशासन यावर काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मालेगावात पुन्हा कोरोनाबाधितांचा संख्या दररोज वाढताना दिसत आहे.
मात्र, नागरिक तरीही निष्काळजीपणे फिरताना दिसत आहेत. मालेगाव शहरात काल १८४ कोरोनाबाधित आढळले होते. विशेष म्हणजे गेल्या चार दिवसात तब्बल ६०३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची संख्या वाढत असताना चित्रपटगृहाबाहेर अशा प्रकारची गर्दी होणे चिंतेची गोष्ट आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मारहाण करुन ट्रॅक्टरसह दोन ट्रॉलीची चोरी; पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा
- प्राचार्य डॉ. शरद अदवंत यांचे निधन, शैक्षणीक-सामाजिक क्षेत्राची मोठी हानी
- ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण
- एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी लॉकडाउनमध्येही धावणार स्मार्ट सिटी बस
- ‘नितीन राऊत साहेब…उच्च राहणीमानाचा खर्च स्वतः च्या खिशातून करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

