नाशिक : केंद्र सरकारच्या तीन कृषी विधेयकाविरुद्ध पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आक्रमक झाले असून गेल्या २४ दिवसांपासून दिल्लीच्या सीमारेषेवर त्यांचं आंदोनल सुरू आहे. दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच असल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडं या आंदोलनावरून राजकारण देखील चांगलंच तापलं आहे.
आता, अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील आणखी शेतकरी बांधव उद्या कृषी कायद्यातील आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीकडे कूच करणार आहेत. नाशिक येथून किसान सभेच्या नेतृत्वाखाली सुरू होणाऱ्या या वाहन मोर्चात महाराष्ट्रभरातील 21 जिल्ह्यांमधून हजारो शेतकरी सहभागी होत आहेत. राज्यभरातील हे शेतकरी नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथे एकत्र येतील.
अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉ. अशोक ढवळे, जे.पी. गावीत, किसन गुजर, डॉ. अजित नवले, सुनील मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या वाहन जथ्याला शुभेच्छा देण्यासाठी केरळचे खासदार आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव के. के. रागेश यांची विशेष उपस्थिती असणार आहे. शेतकऱ्यांना किमान आधार भावाचे संरक्षण मिळावे व केंद्रीय स्तरावर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी यासाठी राज्यसभेत के. के. रागेश यांनी खाजगी विधेयके मांडून देशभरातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संसदेत रान उठविले होते. आताच्या तिन्ही शेतकरीविरोधी आणि जनताविरोधी कायद्यांना राज्यसभेत त्यांनी कसून विरोध केला होता.
शेकडो वाहने असलेला हा वाहन मोर्चा मुंबई-आग्रा महामार्गाने ओझर, पिंपळगाव बसवंत, शिरवाडे (वणी) मार्गे सायंकाळी ५.३० वाजता चांदवड येथे मुक्कामी पोहचेल. दुसऱ्या दिवशी २२ डिसेंबर रोजी सकाळी ८.०० वा चांदवड येथून वाहन मोर्चा पुन्हा सुरू होऊन उमराणे, मालेगाव, धुळे, शिरपूर मार्गे मध्य प्रदेशात मार्गस्थ होईल. या सर्व ठिकाणी जनातेतर्फे त्याचे जंगी स्वागत केले जाईल. मध्य प्रदेश, राजस्थान मार्गे 24 डिसेंबर रोजी तो दिल्ली येथे पोहचेल.
शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घ्यावेत, प्रस्तावित वीज विधेयक रद्द करावे या मागण्याबरोबरच शेतकऱ्यांना आधार भावाचे कायदेशीर संरक्षण देणारा कायदा करावा व सरकारने आधार भावाने शेतीमाल खरेदी करण्याची सक्षम व्यवस्था उभी करून अन्नदात्याला घामाचे रास्त दाम व भुकेलेल्याला रास्त दरात अन्न देण्याची कायदेशीर व्यवस्था उभी करावी या प्रमुख मागण्यांसाठी हा वाहन मोर्चा काढण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिका निवडणुकांमधील आघाडीबाबत सुप्रिया सुळे म्हणतात…
- पवार साहेब अहवाल वाचल्यानंतर योग्य निर्णय घेतील – फडणवीस
- ‘मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी ठाकरेंनी मोदींना फोन केला होता, मग कांजूरमार्गसाठी का करत नाहीत?’
- सर्वसामान्यांचा प्रवास होणार आणखी सुरक्षित; स्वस्त गाड्यांमध्येही असणार ‘ही’ सुविधा
- शाहिनबागसह शेतकरी आंदोलनात दिसणाऱ्या ‘त्या’ आज्जीवर कंगनाची टीका; आता आज्जीनं दिलं सडेतोड उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

