औरंगाबाद: एकीकडे कोरोनाचे तैमान आणि दुसरीकडे लुटमारीचे सत्र सुरुच आहे, रात्रीचा अंदाज घेत एका टोळीने औरंगाबाद रस्त्यावर एका हॉटेल चालकावर धारदार शस्त्राने हल्ला करून पैसे लुटले. पळ काढणाऱ्या टोळीला दौलताबाद पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत माळीवाड्याजवळ पकडले असून या दरोडेखोरांविरोधात खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खुलताबाद येथून जवळच असलेल्या नंद्राबाद येथील अक्षय देवानंद बोडखे रविवारी सायंकाळी औरंगाबाद रोडवरील हॉटेलजवळ उभे असताना तवेरा (एमएच ०४ ईएस ३४६५) गाडीतील लोकांनी त्याचा रस्ता अडवला. तसेच अक्षयचा मोबाईल व रोख ४५०० रुपये हिसकावून घेत त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत मारहाण केली. मात्र, अक्षयने आरडाओरड केल्यामुळे त्यांनी पळ काढला. ही टोळी गाडीत बसून जाताच अक्षयने दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला. दौलताबाद घाटाजवळील वेशीजवळ पोलिसांची नाकेबंदी सुरू होती. तेथे तवेरा गाडी न थांबता सुसाट वेगाने पुढे निघून गेली. या गाडी पाठोपाठ अक्षय बोडखे दुचाकीवर आला. त्याची अवस्था पाहून पोलिसांनी गाडीचा पाठलाग सुरू केला.
दरम्यान, पुढील नाकेबंदीवरील पोलिस कर्मचाऱ्यांना गाडीचे वर्णन आणि माहिती दिली. तोवर तवेरा गाडीने दौलताबादहून माळीवाड्याचा रस्ता धरला. त्या ठिकाणी नाकेबंदीवरील कर्मचारी आणि त्यांच्या मागावर असलेल्या पोलिसांनी त्यांना गाठून पळून जाणाऱ्या टोळीतील चारजणांना पकडले व खुलताबाद पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणात पोलिसांनी भारत सुदाम कांबळे, राजू खंडागळे, साहिल हरुण सय्यद ऊर्फ भोया, अशोक रावसाहेब लंगोटे या आरोपींना अटक केली आहे. इतर दोघे फरार असून त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.
तसेच सदरील सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून औरंगाबाद, जालना, बदनापूर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. अक्षय बोडखे याच्या मांडीला, डोक्याला व छातीला मार लागला असल्याने त्याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कोमल शिंदे या करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- दु:खद! मेजर ध्यानचंद यांचे पुत्र बृजमोहन यांचे निधन, महिन्याभरापुर्वीच झाले होते कोरोनामुक्त
- नवाब मलिक जरा कमी बोलले तर अडचणी कमी होतील, दरेकरांचा टोला
- एबी डिव्हीलीयर्स नंतर ‘हा’ दिग्गज खेळाडूही टी-२० विश्वचषकात करु शकतो पुनरागमन
- ‘नद्यांमध्ये वाहणारे असंख्य मृतदेह, मोदीजी तो गुलाबी चष्मा आतातरी काढा’
- ‘या’ तालुक्यात सर्वात कमी लसीकरण; मृत्युदरही जास्त!


