नवी दिल्ली : देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. पण देश आता तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याचा निर्वाणीचा इशारा ‘एम्स’चे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी दिला. ‘कोविड अनुकूल व्यवहाराचे पालन झाले नाही तर भारतात तिसरी लाट येणे अपरिहार्य आहे. ही लाट येत्या ६ ते ८ आठवड्यांत येऊ शकते,’ असे त्यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील आरोग्य यंत्रणा पूर्णत: कोलमडून गेली होती. अनेक राज्यांत वैद्यकीय ऑक्सिजनचा भीषण तुटवडा निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी रेमडेसिवीरसारख्या औषधींचीही वानवा निर्माण झाली होती. आता ही लाट ओसरल्यानंतर नागरिकांना हायसे वाटत असतानाच डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी भारत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा दिला आहे.
‘देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. नागरिक पुन्हा कोविड अनुकूल व्यवहाराकडे दुर्लक्ष करत आहेत. पहिल्या व दुसऱ्या लाटेत जे काही घडले त्यातून आपण कोणताच धडा घेतला नाही. पुन्हा गर्दी होत आहे. लोक मोठ्या संख्येने एकत्र येत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर रुग्णांची संख्या वाढण्यासाठी फार कमी वेळ लागेल हे स्पष्ट आहे. भारतात तिसरी लाट अपरिहार्य आहे. ही लाट येत्या ६ ते ८ आठवड्यांत येण्याची शक्यता आहे,’ असे ते एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.
लसीकरण पूर्ण होत नाही तोवर सर्वच जण असुरक्षित
शेवटच्या लाटेत आपण नवा स्ट्रेन पाहिला. तो बाहेरून आला व इथे विकसित झाला. त्यामुळे देशातील रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. हा व्हायरस आताही सातत्याने आपले रूप बदलत आहे. त्यामुळे कोरोना हॉटस्पॉटच्या ठिकाणी आक्रमक निगराणी ठेवण्याची गरज आहे,’ असे गुलेरिया म्हणाले. ‘देशातील एखाद्या भागात संसर्ग दर ५ टक्क्यांवर गेला तर तिथे मिनी लॉकडाऊन लावणे अत्यावश्यक आहे. लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्वच जण असुरक्षित आहेत,’ असेही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी ‘महाविकास आघाडी’ स्थापन केली काय?’, सरनाईकांचा उद्धव ठाकरेंना सवाल
- मराठा आंदोलनाची दिशा उद्या नाशकातून ठरणार
- मराठा आरक्षण; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात विनोद पाटलांची पुनर्विचार याचिका
- ‘इच्छा व्यक्त करा; पण सध्या मुख्यमंत्रिपद रिकामे नाही’, राष्ट्रवादीचा नाना पटोले यांना टोला
- ‘…तर पुन्हा कपडे उतरवणार’ ; डब्ल्यूटीसी फायनल वर पूनम पांडेचे नवे भाष्य


