मुंबई: महाराष्ट्रातील खड्ड्यांच्या स्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बुधवारी संध्याकाळी ६ वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. राज्यातील खड्ड्यांबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर पडलेल्या खड्यांवर आजच्या बैठकीत चर्चा होईल. मुंबईच नव्हे तर राज्यातल्या सर्वच भागात पावसामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डे आहेत की, खड्ड्यांमध्ये रस्ते असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह राज्यातील विविध भागांमधील रस्ते खड्डेमय झाल्याचा विषय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निघाला. उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी खड्ड्यांच्या समस्येबाबत नाराजी व्यक्त केली. राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी यंत्रणेला आदेश दिल्याची माहिती देत अशोक चव्हाण यांनी दिली. परंतू राष्ट्रीय महामार्गावरही मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी चर्चा करावी लागेल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. त्यानंतर आज राज्यातील खड्ड्यांच्या स्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बुधवारी संध्याकाळी ६ वाजता तातडीची बैठक बोलावली आहे.
दरम्यान, ‘विदर्भातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांची अवस्था फारच वाईट आहे. योग्य देखभाल होत नसल्यामुळे महामार्गांवर खड्डे आहेत, अनेक ठिकाणी रस्ते उखडले गेले आहेत, बांधकामे अपूर्ण आहेत आणि अनेक पुलांचीही स्थिती भीतीदायक आहे’, या आशयाची एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनीसुद्धा त्यांना या मार्गांच्या स्थितीबाबत आलेले अनुभव सांगितले.
न्यायमूर्तींनीही या रस्त्यांची अवस्था वाईट असल्याचे मान्य करीत न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला एका आठवड्यात खराब रस्त्यांची डागडुजी करून दुरुस्ती झालेल्या रत्यांच्या छायाचित्रांसहित अहवाल न्यायालयापुढे सादर करण्याचे आदेश दिले. तसेच प्राधिकरणाने आपला विदर्भातील रस्त्यांच्या विकासाचा अॅक्शन प्लान सादर करावा, असेही आदेश न्यायालयाने यावेळी दिलेत.
महत्त्वाच्या बातम्या
- सारंगी महाजन राजकारणात येण्याची शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?
- राजकीय नेत्यांच्या फटाके फोडण्यावर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी, म्हणाले..
- ‘गोव्यात शिवसेना विधानसभेच्या २२ जागा लढवणार’, संजय राऊतांची घोषणा
- ‘भाजपचा ईडी, सीबीआयद्वारे कोणावर तरी दबाव आणण्याचा प्रयत्न’, राऊतांचा गंभीर आरोप
- ‘सध्या भाजपसोबतच्या युतीबाबत चर्चा करू नका’, राज ठाकरेंच्या पक्षनेत्यांना सुचना

