मुंबई – घाटकोपर – मानखुर्द जोड रस्त्यावरील उड्डाण पुलावर दुचाकी घसरल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. त्याला सत्ताधाऱ्यांची असंवेदनशीलता, दुर्लक्ष व निष्काळजीपणा जबाबदार असून दुर्दैवी तरुणाचा बळी गेल्यानंतर महापालिकेला उड्डाणपुलाच्या दुरुस्तीबाबत जाग आल्याची घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे स्थायी समितीत केली. सविस्तर लेखी उत्तर मिळेपर्यंत हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्यात आला.
गेल्या महिन्यात मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते घाटकोपर मानखुर्द जोड रस्त्यावरील उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. दि. १.०८.२०२१ रोजी या पुलाच्या उद्घाटनपर भाषणात दस्तुरखुद्द महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या पूलाच्या दर्जाबाबत भारतीय जनता पक्षाकडून महापौर, महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांना पत्र लिहून देखील त्याबाबत अक्षम्य दुर्लक्षच करण्यात आले आहे.
उड्डाणपुलावर रस्ता असमतोल असून त्याच्या दर्जाबाबत सुधारणा करण्याच्या सूचनाही करण्यात आली होती. मात्र, बेजबाबदार प्रशासनाच्या कानापर्यंत या सूचना पोहोचल्याच नाहीत. त्याची परिणीती म्हणून एका दुर्दैवी तरुणाचा बळी गेला. गेली पाच वर्षे उड्डाणपुलाचे काम रखडले होते. उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केल्यानंतरही हा उड्डाणपूल केवळ हलक्या वाहनांसाठी सुरु केला आणि अवजड वाहनांना या उड्डाणपुलावर प्रवेश दिला नाही. हा पूल अवजड वाहनांचा भार घेण्यास अद्याप सक्षम झालेला नसताना उद्घाटनाची घाई कशासाठी ? असा सवालही गटनेते शिंदे यांनी उपस्थित केला.
उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यास कंत्राटदाराला विलंब लागूनही त्याला महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून पाठीशी घातले जात आहे. अद्यापही त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तीन वर्षे विलंब, दोन वेळा कंत्राटात फेरफार, रु. ३०० कोटीची मूळ कंत्राट किंमतीत वाढ आणि एकूण सातशे कोटी रुपये खर्च होऊनही उड्डाणपुलाच्या दर्जाबाबत साशंकता असेल तर हे मुंबईकरांचे दुर्दैव आहे. त्यामुळे उड्डाणपुलावरील बळी गेलेला तरुणाच्या अपघाताबद्दल प्रशासनाला व कंत्राटदाराला जबाबदार धरावे अशी मागणीही भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.
उद्घाटनाची घाई – नामकरणास दिरंगाई
०९.१२.२०२० रोजी खासदार मनोज कोटक यांनी सदर उड्डाणपुलास ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे नामकरण करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. सदर प्रस्ताव जून २०२१ च्या कार्यक्रम पत्रिकेवर आला. १ ऑगस्ट २०२१ ला पुलाचे उद्घाटन झाले परंतु आज १ सप्टेंबर उजाडला असतानाही उड्डाणपूलाचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे करण्यात आलेले नाही याचा भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी निषेध केला.
महत्त्वाच्या बातम्या
- जे माजी मुख्यमंत्र्यांना जमलं नाही ते उद्धव ठाकरेंनी करुन दाखवलं
- शाळा सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकारचा विचार सुरु; मुख्यमंत्री टास्कफोर्सशी चर्चा करुन घेणार निर्णय
- लवकरच भारतीय प्रेक्षकांच्या भेटीला जेम्स बाँड सिरीजमधील २५ वा चित्रपट
- ‘उघड दार उद्धवा आता…’; मनसेचे मंदिरे उघडण्यासाठी पुण्यात जोरदार आंदोलन
- नाशिक : मंदिरे उघडावीत म्हणून आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

