औरंगाबाद : कोटा (राजस्थान) येथे शिक्षणासाठी गेलेले राज्यातील हजारो विद्यार्थी ‘लॉकडाऊन’मुळे त्याठिकाणी अडकून पडले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने 300 ‘बसेस’च्या माध्यमातून कोटा येथे अडकलेल्या त्यांच्या राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्याची व्यवस्था केली आहे. त्याच प्रमाणे आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना देखील परत आणण्याची शासनाने व्यवस्था करावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे आज (दि.18) निवेदनाव्दारे केली आहे.
आ.सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मेडिकल व ‘आयआयटी’ सारख्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी देशभरातून हजारो विद्यार्थी कोटा येथे जातात. याठिकाणी सदरील परीक्षेची चांगल्या पध्दतीने तयारी करून घेतली जाते. त्यामुळे आपल्या राज्यातील विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात याठिकाणी जातात. मात्र ‘लॉकडाऊन’मुळे मागील महिनाभरापासून राज्यातील अनेक विद्यार्थी कोटा येथील विविध वसतिगृह, किरायाच्या घरातच अडकून पडले आहेत. यातील काही विद्यार्थी एकटे तर काही विद्यार्थी पालकांसमवेत राहतात. यातील पालक म्हणून राहणार्या बहुतांश महिला आहेत. अनेक विद्यार्थी ताणतणावाखाली राहत आहेत. आम्हाला याठिकाणाहून घेऊन जा असा तगादा विद्यार्थ्यांनी पालकांकडे लावला आहे. पालकांना देखील आपल्या पाल्यांची चिंता सतावत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक पालक मला फोन व्दारे संपर्क करून कोटा येथे अडकलेल्या आमच्या पाल्यांना परत मुळ गावी आणण्याची व्यवस्था करण्याची विनंती करीत असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे.
त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने ज्या प्रमाणे त्यांच्या राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्याची व्यवस्था केली त्या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना देखील कोटा येथून त्यांच्या मुळ गावी आणण्यासाठी शासनाने व्यवस्था करावी अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

