बीड : लहानपणापासून कधीही वाटले नव्हते की मी मंत्री पदापर्यंत पोहोचेन. खरे तर आमच्या कुटुंबाचे स्वप्न हे स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांना राज्याचे मुख्यमंत्री झालेले पाहण्याचे होते असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. धनंजय मुंडे यांच्या मुळगावी नाथ्रा येथे भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सत्काराला उत्तर देताना मुंडे भावुक होत बालपणीच्या आठवणी जागा केल्या.
जवळपास २५ वर्षांपासून सक्रिय राजकारणात असलेल्या धनंजय मुंडे यांचा नाथ्रा येथे हा पहिलाच नागरी सत्कार होता. एक टन वजनाचा हार घालून ग्रामस्थांनी भूमिपुत्राचे स्वागत केले. लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे आणि स्व. पंडितअण्णा मुंडे यांनी नाथऱ्याचे नाव राज्यात आणि देशात केले. हे नाव पुढील पन्नास वर्षे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात टिकवून अग्रस्थानी ठेवण्याची जबाबदारी आता आमची आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
यावेळी आमदार संजय दौंड, जि. प. अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, जि. प. गटनेते अजय मुंडे, प्रा. डॉ. मधुकर आघाव, रामेश्वर मुंडे, अभय मुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार आदी उपस्थित होते.
नाथ्रा येथे कोट्यवधींची विकासकामे
नाथ्रा गावात २ कोटी ३० लाख रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण व नव्याने सुरू करण्यात आलेल्या ५ कोटी रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. नाथ्रा येथे १.२५ कोटी रुपये खर्चून उभारलेला उच्चालक बंधारा, वाॅर्ड क्रमांक एक मधील ३० लाखांचे रस्ते व नाल्या, २० लाखांचे स्मशानभूमी कंपाउंड, १० लक्ष रुपये खर्चून उभारलेला स्व. पंडित अण्णा मुंडे प्रवासी निवारा, १० लाखांचे वाचनालय, २० लाखांचे जि. प. शाळेतील कंपाउंड व पेव्हर ब्लॉक, दोन्ही अंगणवाड्यांमधील मिळून १० लाखांचे पेव्हर ब्लॉक तसेच पशु वैद्यकीय दवाखान्यातील ५ लाखांचे पेव्हर ब्लॉक आदी कामांचे मुंडेंच्या हस्ते लोकार्पण झाले. यासह सव्वा कोटी रुपयांचा एक बंधारा, देशमुख टाकळी येथील सव्वा कोटी रुपयांचा बंधारा, दीड कोटी रुपयांचे प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्तीकरण, पापनेश्वर येथील ४० लाखांचे सभागृह, वॉर्ड क्र. २ मधील ३० लक्ष रुपयांचे रस्ते व नाल्या, स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक, ओपन जिम व हायमास्ट दिवे असे अंदाजे पाच कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- बीडमध्ये क्षीरसागरांना दणका, नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे आदेश
- दिल्ली सरकारच्या या योजनेमुळे ईलेक्ट्रिक टू-व्हिलर वापरल्यास 22 हजारांची होणार बचत
- ‘गेली तीन दशके पवार साहेब चार खासदारांच्या बळावर पंतप्रधान पदाची स्वप्न बघत आहे’
- २००२ पासून मला संघर्ष, षडयंत्राचा सामना करावा लागला-धनंजय मुंडे
- लासूरगावातून अडीच लाखांचा 38 किलो गांजा जप्त, गुन्हा दाखल


