🕒 1 min read
बीड : मागील २५ वर्षांच्या राजकीय प्रवासात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात मी संघर्ष सहन केला. २००२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीपासून ते आजपर्यंत प्रत्येक वळणावर संघर्ष आणि षडयंत्र यांचा मला सामना करावा लागला, परंतु माझ्या मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्यातील एक सदस्य वाटतो, हे प्रेम आणि हा विश्वास मी कमावला ते इथल्या जनतेच्या बळावरच असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
अंबाजोगाईतील घाटनांदूर येथे परळी ते पानगाव या ३२ किमी मार्गे परळी-चांदापूर-अंबलटेक-घाटनांदूर-पिंप्री-फावडेवाडी या ३६.१०० किमी लांबीच्या ८५ कोटी रुपयांच्या रस्त्याचे भूमिपूजन धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी आ. संजय दौंड, शिवकन्याताई सिरसाट, अशोकराव डक, बजरंग बप्पा सोनवणे, राजकिशोर मोदी, राजेश्वर आबा चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात ना.मुंडे म्हणाले की, कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे मागील एक वर्ष सगळ्यांच्याच आयुष्यात वाया गेले. आता हळू हळु विकासकामांना आपण वेग देत आहोत. येणाऱ्या चार वर्षाच्या काळात या मतदारसंघाचा विकास करताना निधी बास असे म्हणायची वेळ या भागातील लोकांवर येईल असे काम करून दाखवू. इथल्या मातीसाठी निस्वार्थपणे काम करणे हेच माझे उद्दिष्ट असून, रस्ते, नाल्या, वीज या मूलभूत सुविधा देणे हा विकास म्हणता येणार नाही, तो तर कर्तव्याचा भाग आहे. या भागातील लोकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ व्हावी, इथला शेतकरी सधन व्हावा हे माझं या मतदारसंघासाठी पाहिलेलं स्वप्न आहे व ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी वचनबद्ध आहे, असेही धनंजय मुंडे याप्रसंगी म्हणाले.
यावेळी राजकिशोर मोदी, सचिन मुळूक, बन्सी अण्णा सिरसाट, शिवाजी सिरसाट, गोविंद देशमुख, राजेश्वर चव्हाण, विलास बापू मोरे, राजपाल लोमटे, रणजित लोमटे, अजित देशमुख, ज्ञानोबा बप्पा जाधव, बाळासाहेब देशमुख, बालासाहेब शेप, आदी उपस्थित होते.
रस्त्याचे काम बारामती येथील डीपीजे कन्स्ट्रक्शन या कंपनीकडे असून, या कंपनीने कामाचा दर्जा संभाळून जलद गतीने विहित वेळेच्या आत काम पूर्ण करावे यासाठी मुंडेंनी सूचना केल्या. हे रस्ते येणाऱ्या काळात केवळ दळणवळण नव्हे तर औद्योगिक वाहतुकीसाठी वापरले जावेत या दृष्टीने आपण काम करत असल्याचेही मुंडे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवारांचा जन्मच पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहण्यात जाणार ही मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेघ’
- ‘देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे’
- मुख्यमंत्रीपदाबाबत दिलेल्या वचनाच्या वादात नेमकं खोटं कोण बोलत आहे ?
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- शरद पवारांनी कृषी कायद्यांच्या सुधारणेला कधीच विरोध केला नाही – नरेंद्र मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

