खामगाव : शेतकरी राजा हा जगाचा पोशिंदा आहे. कांद्याला समाधानकारक भाव मिळत असताना केंद्रातील लहरी मोदी सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लागू केल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत जाणून-बुजून अधिकची वाढ केली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहे. केंद्र सरकारचा कांदा निर्यात बंदीचा निर्णय हा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असून, केंद्र सरकारने हा अन्यायकारक निर्णय तात्काळ मागे घेऊन बळीराजाला दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केली आहे.
कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरुद्ध शुक्रवार, १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसजणांच्या वतीने निदर्शने करण्यात आली, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोले, नगरसेवक किशोरआप्पा भोसले, नगरसेवक अब्दुल रशीद अब्दुल लतीफ, पं. स. सदस्य विठ्ठल सोनटक्के, मनीष देशमुख, खामगाव विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मंगेश इंगळे, माजी जि. प. सदस्य सुरेशसिंह तोमर, पंजाबरावदादा देशमुख यांच्यासह काँंग्रेसच्या विविध सेल, संघटनांचे पदाधिकारी व शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, ऐन उन्हाळा काळात शासनाने टाळेबंदी लागू केल्यामुळे शेतकऱ्यांना कांदा कवडीमोल भावात विकावा लागला होता. आता कुठेतरी कांद्याचे चांगले उत्पादन होऊन भावसुध्दा चांगले मिळत होते. त्यातच मोदी सरकारने अचानक निर्यातबंदी केल्यामुळे कांद्याचे भाव कोसळले आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा आहे. शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. कांदा जीवनाश्यक वस्तूमध्ये समाविष्ठ नसल्याने त्यावर सरसकट निर्यातबंदी करणे योग्य नाही.
केंद्र सरकारच्या या शेतकरीविरोधी धोरणाचा काँग्रेसजणांच्या वतीने सानंदा यांनी तीव्र शब्दात निषेध करून कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा, शेतकऱ्यांचे कर्दनकाळ असलेल्या मोदी सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसजणांच्या वतीने यापुढे अधिक तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दिला.
यावेळी काँग्रेसजणांनी व उपस्थित शेतकरी बांधवांनी गळ्यात कांद्याचे हार घालुन भाजप सरकारविरोधात कांदा निर्यातबंदी उठवलीच पाहिजे-उठवलीच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी केली. व या निर्णयाचा निषेध म्हणून तहसिलदारांमार्फत पंतप्रधान मोदींना भेट म्हणून ५ किलो कांदा पाठविण्यात आला.
महत्वाच्या बातम्या:-
- श्रीरामपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कांदा निर्यात बंदी विरोधात आंदोलन
- अभिनेत्रीने अनुराग कश्यपवर केले शोषणाचे आरोप; थेट मोदींना मागितली ‘ही’ मदत
- हिवाळी अधिवेशन रद्द करावे आणि अधिवेशनावर होणारा खर्च विदर्भातील वैद्यकीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी द्यावा, कोणाची आहे ही मागणी ?
- माणुसकीला काळिमा फासणारी घटना, येथे चोरले जातात मृतक रुग्णाच्या अंगावरील दागिने
- आता ठाकरे आडनाव बदलून ‘झोलझाल’ ठेवा, निलेश राणेंचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

