श्रीनगर – सीआरपीएफचे जवान राजकुमार झाझरिया यांनी घटनास्थळावरील भयंकर अनुभव सांगितला आहे.
राजकुमार म्हणाले – ‘माझ्या आयुष्यातील तो सगळ्यात भयंकर दिवस होता. पहाटे साडे तीन वाजता आम्ही सगळे जवान जम्मूवरून श्रीनगरला निघालो होतो. काझीगुंड येथे सकाळी अकरा वाजता काही वेळासाठी थांबलो. त्यानंतर अवंतीपुरा येथे तीनच्या सुमारास आम्ही पोहोचलो. दहशतवाद्यांनी ज्या बसला उडवले त्याच्या बसच्या मागची बस मी चालवत होतो. अचानक माझ्या समोर एक मोठा स्फोट झाला. तो स्फोट एवढा मोठा होता की माझ्या बसपासून काही अंतरावर असलेली बस क्षणात दिसेनाशी झाली. स्फोटा झाल्यानंतर दहा मिनिटे आम्हाला समोरचे काहीही दिसत नव्हते. कानठळ्या बसणारा आवाज तर खूप दूरपर्यंत गेला असेल. आम्ही ज्यावेळी बसमधून बाहेर येऊन पाहिले तर जिकडे तिकडे रक्ताचा मांसगोळ्याचा सडा पडला होता. आमचे जवान, आमचे मित्र मंडळी सर्व काही एका क्षणात नाहीसं झालं होतं. त्यांच्या शरीराचे तुकडे उचलताना आमचे हात अक्षरश: थरथरत होते. ते सगळे भयंकर होते.
पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी दहशतवाद्यांनी केलेल्या भयंकर हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. घटनास्थळाचे फोटो बघून संपूर्ण देश हादरला, मात्र जे जवान त्यावेळी घटनास्थळी होते त्यांची परिस्थिती तर अत्यंत वाईट होती. आपल्याच मित्रांच्या हाडामासाचे तुकडे सर्वत्र पसरलेले होते. ते बघून अनेक जवानांच्या तोडूंन किंकाळ्या आल्या. अनेक जण अद्यापही त्या धक्क्यातून सावरलेले नाहीत.
झझारिया हे मूळचे राजस्थानचे असून त्यांच्यासोबत असलेले राजस्थानचे पाच जवान शहीद झाले. ‘या हल्ल्यानंतर काही वेळानंतर सीआरपीएफचा ताफा श्रीनगरला रवाना झाला. संध्याकाळी सातच्या सुमारास ते तळावर पोहोचले मात्र तळावर एक भयंकर शांतता होती. सर्व जवान नाराज होते पण सर्वांच्या आत एक ज्वालामुखी पेटला होता. प्रत्येकाला बदला घ्यायचा होता. त्या रात्री कुणीही जेवले नाही’ असे देखील झझारिया यांनी सांगितले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

