औरंगाबाद : दिवसेंदिवस शहरात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासन आणि मनपा प्रशासन मोठ्या प्रमाणात कामाला लागले आहे. पालन न करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. असे असले तरी लोकप्रतिनिधीच सरकारच्या आव्हानाला आणि प्रशासनाच्या नियमांना पायदळी तुडवत असल्याचे चित्र सध्या विविध ठिकाणी पाहायला मिळत आहे.
जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त वाळूज एमआयडीसी परिसरातील एका मंगल कार्यालयात विविध विकास कामांचे उद्घाटन आणि वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळके, आरोग्य व शिक्षण सभापती अविनाश गलांडे आणि सदस्य यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमांत शासनाच्या नियमाचे उल्लंघन करत ५०० पेक्षा अधिक नागरिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
सदरील कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टंसिंग पाळले गेले नाही. बहुतांश नागरिकांना मास्क नव्हता, कुठल्याही प्रकारचे सॅनिटायझर नव्हते. असे असताना अनेक अधिकारी पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावत शुभेच्छा देण्याचा प्रताप केला. यात मुख्य बाब म्हणजे ग्रामविकास अधिकारी, मुख्याध्यापक आदीसह विविध शासकीय अधिकारी देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे, अशी चर्चा स्थानिक नागरीकातून होत आहे.
कारवाई करणार : सदरील कार्यक्रमाची गायकवाड यांनी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. त्या संपूर्ण प्रकाराची रेकॉर्डिंग करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे याचे भान सर्वांनी राखायला हवे, असे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- कार्यालय झाले सुंदर पण अंगणातील नाल्याचे काय?
- रामाच्या नावाने होतंय पाप ! राम मंदिर ट्रस्टने घेतला निधी संकलनाबाबत मोठा निर्णय
- ‘जोर से छाप, टीएमसी साफ’, मोदींचा बंगालमध्ये नारा
- बाळासाहेबांच्या ‘त्या’ विधानाचा आधार घेत राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- शेतीमालाच्या रक्षणासाठी एक नवी शक्कल; शेतकरी बनला स्मार्ट


