मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकार महत्त्वाच्या निर्णयावर पोहोचलं आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. सध्या राज्यात वीकेंड लॉकडाऊनसह कडक निर्बंध लागू करण्यात आले असून राज्यात संपूर्ण लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे.
यावर आता विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आलेली आहे. ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी हि प्रतिक्रिया दिलेली आहे. ‘लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी सध्याची आरोग्यव्यवस्था सुधारण्याला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, ऑक्सिजनेटेड बेड्स तसेच साध्या बेड्सच्या उपलब्धतेकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. तरच रूग्णांची परवड थांबेल. कोविड प्रतिबंधासाठी जो ३३०० कोटी रूपयांचा निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, तो बजेट घोषणेसारखा न ठेवता, तत्काळ बेड्स आणि वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेसाठी, तत्काळ विनियोग तत्त्वावर वापरला गेला पाहिजे. तशी परवानगी सुद्धा राज्य सरकारने दिली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी केवळ काहीच घटकांचा विचार केला.
पण,बहुतांश घटकांचा विचारच केलेला नाही. बारा बलुतेदार, छोटे व्यवसायी, केश कर्तनालय, फुलवाले यांच्यासाठी कोणतीही योजना नाही. खरे तर हाच रोजगारातील मोठा घटक आहे. त्यांना सामावून घेण्याबाबत तत्काळ निर्णय घ्या. वीजबिल, मालमत्ता कर, जीएसटी यासंदर्भातील सवलती राज्य सरकारने जाहीर करायला हव्या होत्या. पण, तसे झालेले दिसत नाही. हे निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावेत, अशी आमची आग्रही मागणी आहे.
अशा आशयाचे ट्वीट करून फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अशा मागण्या केलेल्या आहेत. दरम्यान, राज्य सरकारतर्फे अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, १ किलो तांदूळ १ महिन्यासाठी मोफत देण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेली आहे. तसेच नोंद केलेले लाभार्थी ७ कोटी आहेत. या सर्वांना १ महिना ३ किलो गहू आणि १ किलो तांदूळ मोफत देणार आहे. तसेच शिवभोजन थाळी १० रुपयात यापूर्वी मिळत होती. ही योजना कोरोना काळात ५ रुपयात केली होती. परंतु आता हि शिवभोजन थाळी गोरगरिबांना मोफत मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता दिलेली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांनी हवाईमार्गे ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पंतप्रधानांना घातली साद
- राजा उदार झाला हाती भोपळा दिला ; मुख्यमंत्र्यांना भाजपचा टोला
- राज्यात १ मे पर्यंत कडक निर्बंध; फेरीवाल्यांसह ‘या’ घटकांसाठी मदतीची मोठी घोषणा !
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे भाषण म्हणजे ‘कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है’
- पंढरपूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय !


