🕒 1 min read
उस्मानाबाद : उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तूभ दिवेगावकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वीच त्यांनी कोरोनाची लस घेतली होती. याबाबत विविध प्रश्न निर्माण झाले होते. यावर जिल्हाधिकाऱ्यांना खुलासा केला आहे. कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. पण कोविड विरुद्ध पूर्ण क्षमता तयार होण्यास दुसरा डोस आणि त्यानंतर काही दिवस लागतात, त्यामुळे कोरोना लसींवर विनाकारण चर्चा करण्यापेक्षा नियमांचे पालन करण्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
ते म्हणतात, ”मागील काही दिवसांपासून शासकीय कार्यालयांमधील गर्दी प्रचंड वाढली. लोक मास्क न घालता गर्दी करत. आपण त्यांना सांगितल्यावर मास्क लावत. पण माझ्याबाबतीत तोवर व्हायचा तो परीणाम झालाच असे म्हणावे लागेल. त्यामुळे नो मास्क नो एन्ट्री आवश्यक आहे .मी दोन आठवड्यांपूर्वी लस घेतली आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. पण कोविड विरुद्ध पूर्ण क्षमता तयार होण्यास दुसरा डोस आणि त्यानंतर काही दिवस लागतात त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्क वापरण्याच्या सूचना आरोग्य विभागाने यासाठीच दिल्या आहेत. हे सर्व पाहता आपण सर्व फ्रंट लाईन वर्कर्स जसे की महसूल, आरोग्य, पोलीस यांनी अत्यंत सावध राहावे. कोणतेही लक्षण अंगावर न काढता तपासणी करून घ्या.
फेब्रुवारी 2020 मध्ये आपल्याकडे केवळ 60 ऑक्सिजन बेडस, 18 व्हेंटिलेटर उपलब्ध होते. आज फेब्रुवारी 2021 मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात 1100 ऑक्सिजन सपोर्टेड बेडस् आहेत. 196 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. इतरही अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. दुसऱ्या लाटेसाठी तयारी करताना अँटीजन किट्स, N95, नवीन ऑक्सिजन सिलेंडर, नवीन 200 ऑक्सिजन लाईन, 2 डी इको व इतर नवी यंत्रसामग्री याबाबत नियोजन केलेले आहे. 960 सीसीसी बेड्सची सुविधा पूनःस्थापित करण्याचे काम वेगात सुरू आहे.
लक्षणे असणाऱ्या सर्व व्यक्तींची चाचणी, विलगीकरण, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ही प्रक्रिया वेगात राबवायची आहे. लोकांनी कोणतेही लक्षण अंगावर काढू नये यासाठी सरकारी खाजगी हॉस्पिटल्स व सर्वांनीच जनजागृती केली पाहिजे. किंबहुना मी लस घेतली आहे. त्यामुळे ताप आला तरी कोणतीही चाचणी करण्याची गरज नाही असे मानून दुर्लक्ष केले असते तर माझ्याकडून लोकांना संसर्ग झाला असता. माझ्यासोबत माझी पत्नी प्रियांका बोकील याही कोविड पॉझिटीव्ह आल्या आहेत. त्यामुळे कुटुंबीयांची कोविड तपासणी महत्वाची ठरते. यामुळे नागरिकांना पुनश्च आवाहन की कोणतेही लक्षण अंगावर काढू नये. लवकरात लवकर तपासणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तूभ दिवेगावकर यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- चिंताजनक! लस घेतल्यानंतरही उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना कोरोना
- पुन्हा लॉकडाऊन? कोरोना फैलावत असल्याने उद्योग क्षेत्र चिंतातूर
- पैठण तालुक्यातील सर्व आठवडी बाजार पंधरा दिवसांसाठी बंद
- ‘उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भिमाचे…नाही काही कामाचे’
- पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, बीड जिल्ह्यातील घटना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
