औरंगाबाद : राज्यासह मराठवाड्यात आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा फैलावतोय. यामुळे उद्योग क्षेत्रांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकतेच ‘सीआयआय’, ‘सीएमआयए’ आणि ‘मासिआ’ या उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींनी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकरांची भेट घेतली. संघटनेच्या वतीने सर्व उद्योगांमध्ये कोरोनाबाबतच्या उपाययोजना करण्याचा विश्वास दिला.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन झाले होते. याचा फटका उद्योगांसह सर्वच क्षेत्रांना बसला. त्यामुळे पुन्हा त्या परिस्थितीला सामोरे जावे तर लागणार नाही ना, अशी भीती उद्योजकांना आहे. यामुळे शुक्रवारी ‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, ‘सीएमआयए’चे अध्यक्ष कमलेश धूत, ‘मासिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ व पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्ताची भेट घेऊन चर्चा केली.
‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी माध्यमांना सांगितले की, आम्ही औरंगाबादेतील सर्व उद्योजक कोरोनाच्या लसीकरणाबाबत सतर्क आहोत. उद्योगांतील कामगार, कर्मचारी, अधिकारी, संचालकांना लस उपलब्ध करण्याचे नियोजन आम्ही केले आहे. लॉकडाऊन काळात कोरोना तपासणीसाठी उद्योगांमध्येच सोय करण्यात आली होती. त्याच पद्धतीने मोठ्या उद्योगांमध्ये लस देण्याची सुविधा उपलब्ध करून देऊ. लसीकरणासाठी कॅम्प घेण्याची आमची तयारी आहे. त्याबाबत शासन निर्णयाची आम्ही वाट पाहात आहोत.
रुग्णवाढीमुळे ८ वीपर्यंतच्या शाळा पुन्हा बंद केल्या आहेत. मंगल कार्यालये, खासगी कोचिंग क्लासेस, बाजारातील गर्दीवर निर्बंध आणण्यात आले आहेत. निष्काळजीपण दिसला तर उद्योगांवरही निर्बंध येऊ शकतात. त्यामुळे संघटनांच्या प्रतिनिधींनी विभागीय आयुक्तांना शब्द दिला की, औरंगाबादेतील शेंद्रा, ऑरिक सिटी, चिकलठाणा, रेल्वे स्टेशन, वाळूज, पैठण रोड आदी ठिकाणच्या सर्व उद्योगांमध्ये कोरोनाबाबतच्या उपाययोजनांचे तंतोतंत पालन केले जाईल, असे सायंकाळी पदाधिकाऱ्यांनी सर्व उद्योगांना लेखी सूचना दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- मुकेश अंबानी उभारणार जगातील सर्वात मोठं प्राणी संग्रहालय
- जालनेकरांनो काळजी घ्या! जिल्ह्यात कोरोना वाढतोय; शनिवारी तिघांचा बळी; ७० नवे रुग्ण
- अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है – जितेंद्र आव्हाड
- ‘उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भिमाचे…नाही काही कामाचे’
- पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, बीड जिल्ह्यातील घटना


