मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनातील रोखठोकमध्ये सध्या राज्याच्या राजकारणातील सर्वात जास्त चिघळलेले किंवा सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या विषयांवर रोखठोक भाष्य केलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आर्यन खान ड्रग्ज केस, मंत्री नवाब मलिकांचे जावई यांच्यावरती केलेली एनसीबी कारवाई ते राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यामागे लागलेला ईडीच्या चौकशीचा ससेमिरा आदी प्रकरणांवर राऊतांनी सडेतोड मत मांडलं आहे तसंच केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजपवर हल्लाबोल केला आहे.
दिवाळीनंतर महाराष्ट्रातील आणखी काही मंत्र्यांना तुरुंगात पाठवू अशी वाचाळकी भाजपचे लोक रोज करतात. मंत्र्यांची नावे घेऊन ते वायफळ बडबड करतात. तुरुंगात पाठवणार म्हणजे ते काय करणार? राज्याचे माजी गृहमंत्री हे ‘ईडी’च्या कोठडीत आहेत. परमबीर सिंग या भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्याने हवेत आरोपांचे बार उडवले व ते अदृश्य झाले. त्या अदृश्य आरोपांवर भाजपने गोंधळ घातला.
ईडी, सीबीआय व इन्कम टॅक्सने सात वेळा देशमुख यांच्या घरावर धाडी घातल्या. देशमुख आता ईडी कार्यालयात गेले व त्यांना अटक केली. ज्या अधिकाऱ्यांवर खून, खंडणी, भ्रष्टाचाराचे गुन्हे मुंबई पोलिसांनीच दाखल केले, त्यांच्या हवेतल्या आरोपांवर केंद्रीय तपास यंत्रणा राज्याच्या गृहमंत्र्यांना अटक करते व पुढच्या चोवीस तासांत हेच परमबीर सिंग महाशय चांदिवाल आयोगासमोर एक प्रतिपादन देतात की, ‘अनिल देशमुख यांच्या विरोधात माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत!’ आरोप करणारा फक्त पळूनच गेला नाही, तर त्याने आरोपच नाकारले, असं रोखठोक भाष्य संजय राऊतांनी केलं आहे.
तरीही अनिल देशमुखांना अटक व त्याआधी यथेच्छ बदनामी केली. देशमुख हे कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय केंद्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात आहेत व भाजप त्याबद्दल जल्लोष करते. ही मनमानी, मस्तवालपणा व विकृत तानाशाही आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत केंद्रीय तपास यंत्रणांचा हा अतिरेक खपवून घेतला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांची अहमदनगर घटनेची दाखल
- ‘नारायण राणेंनी मिळालेल्या खात्यात आपला परफॉर्मन्स दाखवला नाही तर मंत्रिपद जाईल’
- केजरीवाल सरकारची मोठी घोषणा ; मोफत रेशन योजनेत अजून सहा महिने वाढ
- कोर्टाने वानखेडेंची ‘ती’ याचिका फेटाळली, देशाला सत्य कळायला हवे- नवाब मलिक


