🕒 1 min read
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या रडारवर आल्याचे दिसत आहे. जम्मू येथील वायूदलाचा तळ रविवारी मध्यरात्री झालेल्या दोन स्फोटांनी हादरला. भारतीय हवाई दलाच्या तांत्रिक विभागात ड्रोनद्वारे हा हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून १४ किमीवरील भारतीय हवाई दलाच्या जम्मू येथील तळावर रविवारी पहाटे दोन बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटांत दोन जवान किरकोळ जखमी झाले, तर तांत्रिक विभागाच्या इमारतीच्या छताचे नुकसान झाले आहे.
या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस आणि फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली असून कसून तपास सुरू करण्यात आला आहे. कडक सुरक्षाव्यवस्था असतानाही झालेल्या या स्फोटांमुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, स्फोटांची माहिती मिळाल्यानंतर लडाख दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत घटनेचा आढावा घेतला.
हे स्फोट कमी तीव्रतेचे असले तरी हल्ल्यासाठी प्रथमच ड्रोनचा वापर केला गेला. ड्रोनद्वारे हवाई तळावर दोन आयईडी टाकले. एक आयईडी इमारतीच्या छतावर, तर दुसरे मोकळ्या जागेत पडले. पहिला स्फोट रविवारी पहाटे १.३७ वाजता, तर दुसरा १.४३ वाजता झाला. तळावर उभी विमानेच अतिरेक्यांचे लक्ष्य असावे, असा अंदाज तपास यांत्रणांनी व्यक्त केला आहे. या विमानांपासून थोड्या अंतरावरच हे स्फोट झाले. मात्र कोणत्याही यंत्रांचे नुकसान झाले नाही. हे तळ हवाई दलाद्वारे संचालित नागरी विमानतळ आहे. घटनेनंतरही येथील उड्डाणे नियमित होती. जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी हा अतिरेकी हल्ला असल्याचे म्हटले आहे.
हुती बंडखोरांचा हल्ल्याचा पॅटर्न
येमेनमध्ये सक्रिय असलेल्या हुती बंडखोरांकडून सौदी अरेबियाच्या हवाई तळावर हल्ले करण्यात येतात. या बंडखोरांना इराणकडूनही मदत दिली जात असल्याचे म्हटले जाते. हुती बंडखोरांना शस्त्रे, ड्रोन आणि इतर स्फोटके इराणी सैन्याकडून दिले जातात. त्यांच्याकडे चिनी बनावटीचे ड्रोनदेखील आहेत. या ड्रोनच्या माध्यमातून जवळच्या लक्ष्यावर हल्ला केला जातो.
हल्ल्यानंतर मोठ्या घडामोडींना वेग
सध्या हा हल्ला कोणी केला? हे समोर आलेले नसले तरी या हल्ल्यामागे दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे दिसत आहे. हा हल्ला भारतीय वायूसेनेवर करायचा होता का? हा हल्ला म्हणजे पठाणकोटप्रमाणे पुनरावृत्ती करण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता का? दरम्यान हे प्रश्न उपस्थित होत असताना या ठिकाणी ‘एनआयए’ची टीमदेखील दाखल झाली आहे. या हल्ल्याची कसून चौकशी केली जात आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तात्काळ हवाई दलातील अधिकारी एच. एस. अरोरा यांच्याशी चर्चा करत परिस्थिती जाणून घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘विजय वडेट्टीवार यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचं खातं द्यायला हवं होतं, मात्र…’
- पुण्यात उद्यापासून नियम आणखी कडक; जाणून घ्या आज किती रुग्ण संख्या
- औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी; कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट
- ‘तो वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो’; विजय वडेट्टीवारांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
- ‘सत्तेचा माज किती असू शकतो त्याचे हे जिवंत उदाहरण’; भातखळकरांचा संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
