मुंबई : उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा व तुळजाभवानी साखर कारखाना चालू करण्यासंदर्भात संसदेच्या अधिवेशन काळात प्रयत्न करू असे आश्वासन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिले. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी दोन्ही कारखान्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
कारखाने चालू करण्यासाठी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम देणे आवश्यक असल्याने खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.कैलास पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम बाबत मार्ग काढण्यासंदर्भात आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती केली. त्यावर सदरील विषय केंद्र सरकारचा असून, संसदीय अधिवेशन ८ मार्चपासून सुरू होत आहे. या काळामध्ये सदरील विषय मार्गी लावण्यासंदर्भात आपण संबंधितांची बैठक आयोजित करून विषय मार्गी काढू असे पवारांनी म्हटले आहे.
तसेच तेरणा सहकारी साखर कारखाना व तुळजाभवानी साखर कारखान्यांच्या कर्जापोटी जिल्हा बँकेला शासकीय थकहमीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आला आहे. तो अर्थ विभागाकडे पाठवून त्यावर सकारात्मक विचार व्हावा, यासाठी त्यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना फोन करून सूचना केल्या. यावेळी राष्ट्रवादीचे सुरेश बिराजदार आदी उपस्थित होते.
कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाची व्याजासह १० कोटी रक्कम थकबाकी देय बाकी आहे. भविष्य निर्वाह निधीचा विषय केंद्रीय स्तरावर असल्याने याबाबत केंद्रात पाठपुरावा करून मार्ग काढू, असे पवारांनी सांगितले आहे. त्यामुळे कारखाने सुरू होण्याच्या दृष्टीने आणखी महत्वाचे पाऊल पडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तेरणा’ सुरू करण्यासाठी जनआंदोलन पेटणार, नेत्यांना गावबंदीचा इशारा
- वेतन थकल्याने अब्दुल सत्तारांच्या विरोधात ‘शोले स्टाईल’ आंदोलन
- पंतप्रधानांना स्पीड पोस्टने पाठवल्या गोवऱ्या; गॅस दरवाढीचा निषेध
- औरंगाबाद मनपा भुंखडाचा वाद विधानसभेत; नगरविकास मंत्री शिंदे यांचा तथ्य नसल्याचा दावा
- कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी निर्बंध कडक करा; अर्जुन खोतकर यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना


