मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी आत्महत्येची धमकी दिल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पारनेरमधील लोकप्रतिनिधीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये दिला आहे. यात त्यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख हा आमदार निलेश लंके यांच्यावर असल्याचे दिसत आहे.
याची गंभीर दखल घेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. ‘ज्योती देवरे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत. त्यांनी आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप सुद्धा जारी केली आहे. या प्रकरणाची तातडीने दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि त्यांचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून घेत त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
पत्रात म्हटले आहे की, तहसीलदार ज्योती देवरे यांनी ११ मिनिटांची एक ऑडियो क्लिप जारी करून अनेक गंभीर आरोप स्थानिक लोकप्रतिनिधीवर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केले आहेत. लसीकरणावरून काही कर्मचाऱ्यांना पोलिस अधिकाऱ्यांच्या समोर मारहाण करणे, अश्लील शिविगाळ करणे, महिला कर्मचाऱ्यांना मारण्यासाठी महिला पोलिसांना बोलाविण्यास सांगणे, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांपर्यंत प्रकरण नेल्यानंतर तहसिलदार ज्योतीताई देवरे यांच्याच बदनामीचा प्रयत्न करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही त्यांना धमक्या प्राप्त होणे, कोरोना काळात नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यातही अडचणी उत्पन्न करणे आणि मग थेट मंत्र्यांकडे त्यांच्या बदलीची शिफारस करणे, यातून महिला अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करणे, असे अनेक गंभीर आरोप त्यांनी केले आहेत.
थेट दीपाली चव्हाण प्रकरणाचा उल्लेख करून मी सुद्धा तुझ्याकडे येतेय, हा त्यांचा ऑडिओमधील आवाज अंगावर शहारे आणणारा आहे. एक स्त्री अधिकारी आपले कर्तव्य पार पाडत असताना संपूर्ण यंत्रणाच तिचे मानसिक खच्चीकरण करीत असेल आणि परिणामी त्या महिला अधिकाऱ्याला आत्महत्येचा इशारा द्यावा लागत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आणि मनाला वेदना देणारी आहे.
खरे तर कोरोना काळात संपूर्ण यंत्रणा दबावात काम करीत असताना त्यांना आणखी नाहक त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाणे अतिशय आवश्यक आहे. माझी आपल्याला विनंती आहे की, आपण यात तत्काळ लक्ष घालून हस्तक्षेप करावा. या महिला अधिकाऱ्याला आपण स्वत: बोलावून घेऊन त्यांची तक्रार ऐकून घ्यावी आणि त्यांच्या व्यथा समजून घ्याव्यात आणि तत्काळ त्यावर तोडगा काढून त्या अधिकाऱ्याला न्याय द्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या महिला अधिकाऱ्याची इतकी अवहेलना होऊ नये, हीच कळकळीची विनंती, असेही देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनेच्या हल्ल्यांना आणि धमक्यांना मी घाबरत नाही – किरीटी सोमय्या
- लसींचे दोन डोस घेतले तरी देखील खासदार अमोल कोल्हेंना कोरोनाची लागण
- ‘मी त्याच दिवशी खासदारकी सोडणार होतो पण…’; छत्रपती संभाजीराजेंचा गौप्यस्फोट
- जनआर्शिवाद यात्रा : डॉ. भागवत कराड येण्याआधीच स्थानिक नेत्यांनी भागवली सत्काराची हौस
- ‘संभाजी भोसलेंना अटक करा’; गुणरत्न सदावर्ते यांची स्फोटक मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
