औरंगाबाद : नाशिक येथील ऑक्सिजन गळतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील नामांकित रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटची महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी (दि.२३) पाहणी केली. त्यांनी एमजीएम, डॉ. हेडगेवार व कमलनयन बजाज रुग्णालयातील ऑक्सीजन प्लांट व फायर सेफ्टी यंत्रणांची पाहणी करताना संबंधित रूग्णालयांत तत्काळ स्वयंचलित यंत्रणा बसविण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच ऑक्सिजनचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. ऑक्सीजन प्लांटमध्ये मेंटेनन्स करण्यासाठी व काळजी घेण्यासाठी तत्काळ तंत्रज्ञांची नियुक्ती करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
या पाहणीत आयुक्तांसमवेत जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दोड व प्रदीप कुलकर्णी यांची एक तज्ज्ञ टीम होती. ही टीम आता दररोज शहरातील खासगी रुग्णालयांना भेट देऊन येथील ऑक्सिजन प्लांट व फायर प्लांट याची पाहणी करणार आहे. यावेळी डॉ. हेडगेवार रुग्णालयातील ऑक्सीजन प्लांटची पाहणी केली असता तेथे रुग्णांना मॅन्युअल ऑक्सिजन पुरवठा केला जात असल्याचे दिसून आले. तेथे तत्काळ स्वयंचलित यंत्रणा बसवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
तसेच त्यांनी हेगडेवार रुग्णालयातील कोविड वॉर्डचीही पाहणी केली. तेथे त्यांना अनेक ऑक्सिजन बेडवर कमी लक्षणे असलेल्या कोविंड पेशंट आढळले. काही पेशंट बेडवर जेवण घेत असताना ऑक्सिजन युनिटचा कॉक चालूच असल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी वॉर्डमधील डॉक्टर व कर्मचार्यांना ऑक्सिजनचा अपव्यय होणार नाही, याबाबत सूचना दिल्या.
यावेळी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अश्विनी कुमार तुपकरी, तंत्रज्ञ टी.पी. काळे यांची उपस्थिती होती. कमलनयन बजाज रुग्णालयातही ऑक्सिजन प्लांटची पाहणी करत तेथील कोविड वार्डची पाहणी केली. याप्रसंगी डॉ. नताशा वर्मा मुख्य प्रशासकीय अधिकारी तसेच मिलिंद वैष्णव मेडिकल डायरेक्टर हे सोबत होते. ऑक्सिजन वाया न घालवता व्यवस्थितपणे वापर करावा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनानेही सर केले ‘माउंट एव्हरेस्ट’! नॉर्वेचा गिर्यारोहक पॉझिटिव्ह
- शहरात तुटवडा, मनपाने मागवले १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन!
- पीपीई कीट घालत कोव्हीड हॉस्पिटलची पाहणी करणाऱ्या खासदार मुंडे यांना कोरोनाची लक्षणे
- भाजपच्या विनाशाला CBI ची टोळधाडच कारणीभूत ठरणार; मिटकरींच भाकीत
- जळकोटमध्ये डेडिकेटेड कोविड रुग्णालयाची नुसतीच घोषणा !


