Share

‘एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ कर्नाटकचे मुख्यमंत्री व देशाच्या पंतप्रधानांकडे घेऊन जाच’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा वाढणार अशी लक्षणे दिसत आहेत. कारण दोन दिवसांपूर्वी बेळगाव येथे कन्नड रक्षण वेदिके संघटनेने शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर हल्ला केला होता. तसेच गाडीवरील भगवा ध्वज काढून टाकत, भगव्या फलकास काळे फासण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर प्रत्युत्तरात कोल्हापुरात शिवसेनेकडून कर्नाटकच्या बसेसना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, बेळगाव सीमाभागात कर्नाटक सरकार आणि स्थानिक पोलिसांची गुंडगिरी सुरूच सीमावादावरून कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारने एकमेकांवर कुरघोडी करत असतानाचा तिथल्या पोलिसांनीही माणुसकीला लाजवेल असे कृत्य केले आहे. मराठी भाषिक तरुणांनी व्हॉट्सअॅपवर स्टेट्स ठेवले म्हणून अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कानडी पोलिसांकडून सातत्याने मराठी भाषिकांवर अमानुष अत्याचार होत असल्याचा आरोप स्थानिक मराठी भाषिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अजून किती दिवस कानडी जुलूमशाही सुरू राहणार? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे. यावरून आजच्या सामना अग्रलेखातून केंद्र सरकार आणि कर्नाटक मधील भाजप सरकारवर निशाणा साधला असून एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ कर्नाटकचे मुख्यमंत्री व देशाच्या पंतप्रधानांकडे घेऊन जाण्याची मागणी देखील यावेळी त्यांनी केली.

‘कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने बेळगावसह सीमा भागातील मराठी माणसांवर हल्ले सुरू केले आहेत. मराठी भाषिकांच्या दुकानांवरील मराठी पाटय़ा उचकटवून टाकणे, मराठी ‘नंबरप्लेट’ असलेल्या गाडय़ांवर हल्ले करणे, मराठी तरुणांनी मोबाईलवर मराठी भाषेचे स्टेटस ठेवल्याचा राग म्हणून त्यांना अमानुष मारहाण करणे, ‘मराठी भाषिक वाघ आहेत’ अशा प्रकारच्या स्टेटसवर आक्षेप घेऊन जुलूम करणे हे अमानुष आणि लोकशाहीविरोधी आहे. त्याआधी बेळगाव महापालिकेवरील भगवा ध्वज उतरवून तेथे त्या कन्नड रक्षण वेदिकेवाल्यांनी लाल-पिवळा ध्वज लावला. त्यावरून मराठी तरुण आणि कानडी पोलिसांत झटापट झाली, त्यात गुन्हेगार ठरवले गेले ते मराठी तरुण. हे गेल्या सत्तरेक वर्षांपासून सुरूच आहे. आताही दोन दिवसांपूर्वी बेळगावात शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या गाडीवर हल्ला करून फार मोठे शौर्य गाजविले या भ्रमात त्या कानडी संघटनांनी राहू नये.

या सर्व प्रकरणी महाराष्ट्राने संयम सोडला तर कानडी राज्यास जबरदस्त अशी आर्थिक व इतर किंमत मोजावी लागेल; पण देश एक आहे असे आम्ही मानतो. देशांतर्गत भाषिक वाद म्हणजे मराठी किंवा कानडी भाषिकांचा झगडा नाही. दोन भाषिकांनी या प्रश्नी समोरासमोर येऊन एकमेकांची डोकी फोडावीत, एकमेकांच्या मालमत्तांचे नुकसान करावे असे आम्हाला अजिबात वाटत नाही. बेळगावसह संपूर्ण सीमा भागातील मराठी माणूस, मराठी भाषा व संस्कृतीचे रक्षण करणे हे महाराष्ट्राचे कर्तव्यच ठरते. मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री पवार यांनी गेल्या काही दिवसांत ”बेळगाव पुन्हा महाराष्ट्रात आणणारच” असे मजबुतीने जाहीर केले. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे व महाराष्ट्र जे बोलतो ते करून दाखवतो. यावर कर्नाटकाच्या एका मंत्र्याने असे तारे तोडले की, ”शिवराय हे तर कर्नाटकाचे होते.” बरे झाले, यानिमित्ताने कानडी राजकारण्यांना शिवराय आपले वाटू लागले.

अहो, कानडी आप्पा, शिवराय तुमचेच म्हणता ना, मग बेळगाव महानगरपालिकेवरील शिवरायांचा भगवा ध्वज उतरविण्याचे पाप का करता? शिवराय खरंच तुमचे असतील तर मग बेळगावात ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणणाऱयांची डोकी का फोडता? शिवराय तुमचेच आहेत हे मान्य केले तर येळ्ळूर गावातील शिवरायांचा पुतळा रातोरात का हलवता? शिवराय तर संपूर्ण विश्वाचेच आहेत. कर्नाटकाच्या मातीत शिवरायांच्या घोडय़ाच्या टापा उमटल्या असतील, पण शिवरायांच्या जीवनाचे सार काही त्यांच्या मातीत मिसळून गेल्याचे दिसत नाही. ज्या पद्धतीने मराठी भाषिकांवर अमानुष अत्याचार कानडी मुलुखांत सुरू आहेत ते येडुरप्पांचे भाजप सरकार उघडय़ा डोळय़ांनी पाहत आहे. नुसतेच पाहत नाही तर अत्याचार करणाऱयांना बळ देत आहे. बेळगावचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. म्हणजे प्रकरण न्यायप्रवीष्ट असताना कानडी संघटनांनी हा असा तमाशा करणे बेकायदेशीर आहे.

मराठी भाषेचा वापर करणे हा कानडी मुलुखात गुन्हा ठरत असेल तर मराठीद्वेष्टय़ा कानडी राज्यकर्त्यांच्या नसांत कणभर तरी राष्ट्रवाद उरला आहे काय, याचा विचार करावा लागेल. भाषावार प्रांतरचनेत महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे. बेळगावसह 20 लाखांचा मराठी मुलूख अन्याय्य पद्धतीने कर्नाटक राज्यात ढकलला गेला. या अन्यायाविरुद्ध तेथील मराठी बांधवांचा निरंतर लढा सुरू आहे; पण मराठीसाठी संघर्ष करणाऱ्यांना हे असे मारणे घटनेच्या कोणत्या कलमात बसते? महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात कानडी बांधव त्यांचे उद्योग-व्यापार करीत आहेत. संस्था, संघटना चालवीत आहेत. मराठी माणसाने ना त्यांच्यावर कधी हल्ले केले, ना महाराष्ट्र सरकारने कधी त्यांच्या कार्यात अडथळे आणले. देशाच्या अनेक भागांत मराठी भाषिकांची वर्दळ, वसाहती व राज्य आहेत. इंदूरपासून बडोद्यापर्यंत सर्वत्र मराठीत व्यवहार सुरू आहेत. म्हणून तेथील राज्यकर्ते किंवा राजकारण्यांनी मराठी भाषिकांवर आगपाखड केली नाही.

मराठी मुंबईचे रूपडे सध्या पुरते पालटून गेले आहे. गुजरात्यांपासून बंगाली, पंजाबी, हिंदी भाषिक मोठय़ा प्रमाणावर येथे आहेतच, पण मराठी माणसाने कधी त्यांच्यावर जुलूम केला नाही. महाराष्ट्रात ‘इडली, वडा, डोसा’ साम्राज्य तर कानडी हॉटेलवाल्यांचेच आहे. त्याबद्दल सगळय़ांना आनंदच आहे; पण बेळगावात सध्या मराठी लोकांवर जे हल्लेसत्र सुरू आहे ते संतापजनक आहे. महाराष्ट्राने एकवटून या हल्ल्याचा प्रतिकार केलाच पाहिजे. प्रश्न फक्त शिवसेनेचा नाही, महाराष्ट्राशी इमान राखणाऱया सर्वच राजकीय पक्षांचा आणि संघटना, संस्थांचा आहे. हा प्रश्न सत्ताधारी पक्षाचा आहे, तितकाच विरोधी पक्षाचा आहे. बेळगावातील मराठी माणसांवरील अत्याचार थांबत नसतील तर केंद्राने संपूर्ण सीमा भागास केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करावे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही विनंती करतो, कर्नाटकात आणि दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. बेळगावातील मराठी भाषिकांवरील अत्याचारांविरुद्ध एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ कर्नाटकचे मुख्यमंत्री व देशाच्या पंतप्रधानांकडे घेऊन जाच. बेळगावातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवा, मराठी माणसाला न्याय द्या!’ अशी मागणी यावेळी सामाना अग्रलेखातून करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!