पुणे : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच महाराष्ट्र व मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेसह आता भाजपनेही त्यांच्या या विधानावरून टीका केली आहे. भाजपने त्यांच्या विधानाला असहमती दर्शवली आहे. यातच आता शिवसेनेच्या नवनिर्वाचित उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील राज्यपालांवर जळजळीत टीका केली आहे. राज्यपाल कोश्यारी हे संवेदनशून्य असून त्यांनी त्वरित राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानावर सुषमा अंधारे म्हणाल्या कि, “राज्यपाल हे पद कोणत्याही पक्षाचे नसते. राज्यपाल हे एकप्रकारे राज्याचे पालक असतात. त्यांनी राज्याप्रती पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन किंवा आकस बुद्धी ठेवता कामा नये. त्यांनी राज्याचे ममतेने संगोपन करणे ही संविधानिक जबाबदारी असते. मात्र महामहीम कोश्यारीजींवर राज्यापेक्षा अधिक जबाबदारी ही भाजपला सांभाळण्याची आहे. राज्यपालांनी अशा प्रकारचं विधान करणे म्हणजे त्या राज्यपाल पदाचा अवमान केल्यासारखेच आहे, त्यामुळे त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मलमपट्टी करू नये, असा असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
पुढे बोलताना सुषमा अंधारे यांनी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. “राज्यपाल पदावर बसलेल्या व्यक्तीने कोणतीही वक्तव्य करताना काळजी घ्यायला हवी. राज्यपालांच्या वक्तव्यामुळे एवढे राजकारण सुरू झाले आहे, तर मग बाळासाहेब ठाकरेंचे तथाकथित (सो कॉल्ड) वारसदार काय करत आहेत. त्यांनी त्यांच्या तथाकथित महाशक्तीला (भाजप) विनंती करावी कि, राज्यपालांचा राजीनामा घेऊन त्यांना तातडीने परत बोलवावे”, असे त्यांनी अप्रत्यक्षरीत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितलं आहे.
राज्यपालांचे स्पष्टीकरण
राज्यपालांच्या वक्तव्यानंतर आज दिवसभर राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेद करत मोठ्या प्रमाणावर टीका केली. त्यांनतर राज्यपालांनी पुढे येऊन स्पष्टीकरण दिले आहे. “मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला आहे. तसेच मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता”, असे राज्यपाल म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- Supriya Sule | बहोत हो गया, राज्यपालांना उत्तराखंडला परत पाठवा – सुप्रिया सुळे
- Rupali patil | भगतसिंह कोश्यारी चले जाओ- रूपाली पाटील-ठोंबरे
- Eknath shinde | “मी मुलाखत दिली तर राज्यात भूकंप होईल”; एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
- Bhagat Singh Koshyari । मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा हेतू नव्हता; वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपालांचे स्पष्टीकरण
- Eknath Shinde । “राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही, त्यामुळे त्यांनी…”; मुख्यमंत्री शिंदेंचा सल्ला


