कोल्हापूर /प्रतिनिधी – दूधगंगा नदीच्या सुळकुड बंधार्यावरून इचलकरंजी शहरासाठी नियोजित नळपाणी योजना रद्द करावी. या मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर सहा तालुक्यातील शेतक-यांच्या शिष्टमंडळाने आंदोलन केले .ही योजना रद्द करावी या आशयाचे निवेदन कार्यकारी अभियंता डी के महाजन यांना दिले.
यावेळी पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं,देणार नाही-देणार नाही,लाभक्षेत्राबाहेर पाणी देणार नाही,शेतकरी एकजुटीचा विजय असो,रद्द करा-रद्द करा,दूधगंगेवरून इचलकरंजीसाठीची पाणी योजना रद्द करा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
निवेदन मधील मजकूर असा
इचलकरंजी शहरासाठी दूधगंगा नदीच्या सुळकुड बंधार्यावरून नळ पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन आहे. तथापि इचलकरंजी शहरासाठी पंचगंगा नदी वरून पिण्याच्या पाण्याची तरतूद आहे. परंतु पंचगंगा नदीच्या प्रदूषणाची बाब पुढे करून इचलकरंजी नगरपालिकेने कृष्णा व त्यानंतर वारणा नदीवरून नळ पाणीपुरवठा योजना करण्याचा प्रयत्न केला. पण या दोन्ही नदी काठच्या लोकांच्या प्रखर विरोधामुळे या योजना होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी दूधगंगा नदीवरून पिण्यासाठी पाणी उपसण्याचा घाट घातला आहे.
दूधगंगा धरणाच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी व कालव्यासाठी दूधगंगा नदीच्या लाभ क्षेत्रातील शेतकर्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. जर इचलकरंजी सारख्या लाभ क्षेत्राबाहेरील लोकांना पाणी दिले तर तो लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. दूधगंगा नदीवर राधानगरी भुदरगड कागल करवीर हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील 61 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनासाठी अवलंबून आहे. त्यापैकी 2019 अखेर 41 हजार हेक्टर इतके सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. म्हणजेच वीस2 हजार हेक्टर इतके क्षेत्र सिंचनाखाली येणे बाकी आहे.
पाटबंधारे खात्याच्या आकडेवारी वरून दूधगंगा प्रकल्पातील एकूण 23.99 टीएमसी जिवंत पाणीसाठा व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील 0.61 टीएमसी असे एकूण 24.60 टीएमसी पैकी 5.95 इतक्या पाण्याचे पिण्यासाठी आरक्षण आहे. त्यापैकी 4.8 03 टीएमसी इतक्या पाण्याचे वाटप झाले असून फक्त 1. 147 टीएमसी इतका पिण्याच्या पाण्याचा कोटा शिल्लक आहे. दुधगंगा नदीच्या लाभ क्षेत्रातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता शिल्लक असलेला पिण्याच्या पाण्याचा कोटा भविष्यात लाभ क्षेत्रात कमी पडणार आहे. त्यामुळे दूधगंगा नदीचे पाणी लाभ क्षेत्राबाहेर न देता पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी उपाय योजना कराव्यात व त्या पाण्यावर ट्रीटमेंट प्लांट बसवून पाणी पिण्यायोग्य करावे व दूधगंगा नदी इचलकरंजी शहरा साठीची प्रस्तावित योजना रद्द करावी. अशी आग्रही मागणी या निवेदनात केली आहे.
यावेळी भवानीसिंह घोरपडे,दिलीप चव्हाण, प्रसाद चव्हाण, सुरेश चव्हाण, युवराज पाटील, बाबगोंडा पाटील, संदीप पाटील, भुपाल पाटील,भैरू ताकमारे, शिवाजी निंबाळकर, लखन हेगडे, सुदर्शन मजले, सरपंच ज्योती पोवाडे, बापुसो पाटील, लक्ष्मीकांत पाटील,आण्णासो चौगुले, राजेंद्र जाधव,आप्पासो हुच्चे, नंदकुमार माळकर ,बाळासो हेगडे आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या –
ही तर तात्पुरती मलमपट्टी, खड्डे पडलेल्या रस्त्यावर तात्पुरते पॅच मारायचे काम सुरु
तुम्ही धीर सोडू नका, राज ठाकरेंचं ‘मनसे’ आवाहन
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पुढे ढकलण्याची रयतची मागणी
संजय राऊत बोलले आणि वादळच आले; मंत्री जितेंद्र आव्हाडांनी देखील केले ‘त्या’ विधानाचे समर्थन
स्वरमार्तंड! पंडित जसराज यांचे निधन;भारतीय संगीतातलं विद्यापीठ हरवल्याची भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

