पुणे : राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लगावले आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. गृह विभागाकडून या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे मागील वर्षात नियमावली जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार यंदाही मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं लागणार आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले आहे की सार्वजनिक गणेश मंडळांसाठी गणेश मूर्तीची उंची ४ फूटांपर्यंत असू शकते. त्याशिवाय घरात बसलेल्या गणपती मूर्तीची उंची २ फूट ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.गेल्या वर्षीप्रमाणेच मार्गदर्शकतत्त्व लागू करण्यात आले आहे. यात गणपतीच्या सार्वजनिक मिरवणुका काढण्यात येऊ नये असेही सूचनेत म्हटले आहे. घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी प्रत्येक वॉर्डात कृत्रिम तलाव निर्माण करण्याच्या सूचनाही राज्य शासनाने स्थानिक प्रशासनांना दिल्या आहेत. गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात ते यंदा आयोजित करण्यात येणार नाही, अशी सूचना देण्यात आली आहे.
सरकारने घेतलेले निर्णय हे पूर्णपणे एकतर्फी असून त्याबाबत फेरविचार करावा, अशी विनंती सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.गृहविभागाने परस्पर नियमावली जाहीर केली. यामुळे मंडळ आणि मूर्तीकारांमध्ये नाराजीचं तसेच असंतोषाचं वातावरण आहे. सरकारने घेतलेला निर्णय हा पूर्णपणे एकतर्फी आहे. त्यामुळे या नियमावलीबाबत सरकारने पुन्हा एकदा फेरविचार करावा अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.दरम्यान,या नियमावलीवरुन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि मूर्तिकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. गणपतीच्या मूर्तीच्या उंचीबाबत नेमक्या कोणत्या लॉजिकचा वापर सरकारकडून करण्यात आला आहे याबाबत देखील उलटसुलट चर्चा सुरु आहेत.
गर्दी टाळणे हा सरकारचा उद्देश असला तरीही बाप्पांच्या मूर्तीच्या उंचीबाबत आखून दिलेले नियम अनाकलनीय असल्याचे मूर्तिकार गणेश लांजेकर यांचे म्हणणे आहे. शासनाला न लोककलाकारांची काळजी आहे ना मूर्तिकारांची त्यांना फक्त आपल्या खुर्चीची पडली आहे असे लांजेकर सांगतात. या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे असे या सूचनांमध्ये सांगण्यात आल्याने मूर्तिकार चांगलेच धास्तावले आहेत. कारण वर्षभर त्यांनी घेतलेली मेहनत कदाचित शासनाने मुर्तीकारांशी चर्चा न करता घेतलेल्या निर्णयामुळे वाया जाऊ शकते अशी परिस्थिती आहे. शासन नियम जाहीर करते मात्र त्याचे परिणाम काय होतील याबाबत जरासा देखील विचार करते की नाही असा सवाल देखील उपस्थित होत आहे. शासन या मूर्तीकारांना मदत करणे तर दूरच पण आणखी अडचणीत आणण्याचे काम करत असल्याचेच या कृतीमधून दिसून येत आहे असा देखील आरोप आता होऊ लागला आहे.
महत्वाच्या बातम्या
- परिवार संवाद दौरा स्थगित; राष्ट्रवादीने विरोधी पक्षाला दिली स्वतः टीका करण्याची संधी
- ‘वडेट्टीवार बोगस, फंटूस आणि फडतूस माणूस… आता त्यांनी बीडमध्ये येऊन दाखवावं’
- कोणत्याही चौकशीला मी घाबरत नाही असे छातीठोकपणे सांगणारे देशमुख आज पळवाट शोधत आहेत ?
- औरंगाबादेत मनपा आणखी चार पेट्रोल पंप सुरु करणार, मनपा आयुक्तांनी व्यक्त केला निर्धार!
- ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांना ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा अधिक धोका – WHO


