मुंबई : राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन अखेर हायकोर्टात पोहोचले आहे. कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत, त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांनी आज मंत्रालयावर धडक मोर्चा काढला होता. मात्र पोलिसांनी अनेक आंदोलकांना मंत्रालयापर्यंत पोहचू दिले नाही.
न्यायालयाचा मनाई आदेश, सरकारनं स्थापन केलेली समिती आणि एसटी महामंडळानं न्यायालयात अवमान याचिका दाखल केल्यानंतरही एसटी कामगार मागे हटण्यास तयार नाहीत. दिवाळीच्या आधीपासून सुरू झालेला कामगारांचा संप सुरूच असून अधिकाधिक व्यापक होत चालला आहे. त्यामुळं राज्यातील सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी कामगार आणि संघटनांना कळकळीचं आवाहन केलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी राज्य सरकार मनापासून प्रयत्न करीत आहे. आपला प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार काय काय पावलं उचलत आहे हे उच्च न्यायालयासमोर देखील सांगितलेलं आहे. न्यायालयाचं देखील समाधान झालं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
न्यायालयाच्या सूचनेप्रमाणं आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे. अशा परिस्थितीत राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही करोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळं कृपया सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी नम्र विनंती आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- पडळकर आणि सदाभाऊ कामगारांच्या पगाराची जबाबदारी घेणार आहेत का?-अनिल परब
- मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार; मुन्ना यादवची प्रतिक्रिया
- भाजपा नेते एसटी कर्मचाऱ्यांना चिथवून गलिच्छ राजकारण करत आहेत-सचिन सावंत
- ‘मलिक साहेब, हायड्रोजन सोडा आता तुम्हाला ऑक्सिजनची गरज लागेल’
- भाजपा नेते एसटी कर्मचाऱ्यांना चिथवून गलिच्छ राजकारण करत आहेत-सचिन सावंत


