🕒 1 min read
फुलंब्री :‘नमूया आधी देश भारती, मानवतेची करूनी आरती..’ या गणाने लोकनाट्याला सुरुवात झाली. त्यानंतर ‘सोडा गं बाई याला सोडा, कोरोनाला धराया जातो वेडा..’ सुरु झाले आणि या लोकगीतावर ठेका धरण्याचा मोह न आवरल्यामुळे उपस्थितानी नाचण्यास सुरुवात केली.
फुलंब्री तालुक्यातील चौदा गावांमध्ये लोकरंजन लोककला प्रतिष्ठानतर्फे कोरोनासह लसीकरण आणि महाविकास आघाडी सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत लोकनाट्याच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती सुरु आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यभर लोककला पथकामार्फत जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही आठ ते दहा कलापथकांमार्फत कोरोना व लोककल्याणकारी योजनांबाबत लोकरंजनातून लोकप्रबोधन करण्यात येत आहे. शाहीर डॉ. शेषराव पठाडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकरंजन लोककला प्रतिष्ठानच्या वतीने फुलंब्री शहर, किनगाव, वारेगाव, खामगाव, बाबरा, बोधेगाव, पीरबावडा, आळंद, कोलते टाकळी, तळेगाव, वडोदबाजार, शेरोडी, निमखेडा आणि वडोद बाजार या गावांमध्ये कार्यक्रम सादर करण्यात आले. तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांकडून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लग्नासह सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना उपस्थितीबद्दलचे निर्बंध यावर विविध प्रसंगांतून कलावंतानी रंग भरले. गवळण मावशीला काय माल घेतला, असे विचारते. यावर मावशी कोरोना काळात माझं गिऱ्हाईक पक्क असल्याचे सांगून ज्याला हल्ली डिमांड त्यावर आपली कमांड असे म्हणते. मास्क, सॅनिटायझर विकायला घेतल्याचे सांगताच लोक पोट धरून हसतात. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सरकारच्या अभियानाचे महत्वही विनोदी ढंगातून जनतेला पटवण्यात कलावंत यशस्वी झाले.
समर्पक साथ-संगत
भाऊ पठाडे यांनी अस्सल ग्रामीण संवाद फेकून धमाल केली. शाहीर पठाडे यांची अवीट गोडीची गायकी, त्यांना वंदना एंडोले यांनी दिलेली समर्पक साथ, सिद्धार्थ ढाले यांची हर्मोनियमवर विद्युत गतीने फिरणारी बोटे आणि पिटर पाटोळे यांच्या ढोलकीच्या खणखणाटाने कार्यक्रम चांगलाच रंगतदार झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावोगावचे सरपंच, ग्रा. पं. सदस्य, पोलीस पाटील, चेअरमन, तंटामुक्तीचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, स्थानिक पत्रकारांचे सहकार्य लाभले.
महत्वाच्या बातम्या
- जाणून घ्या कृषी कायद्यांच्या विरोधातील ‘चक्का जाम’ आंदोलनाला राज्यात कसा मिळाला प्रतिसाद
- अन्यथा राज्यपालांविरोधात आम्हाला कोर्टात जावे लागेल : संजय राऊत
- मनपाची धडाकेबाज कारवाई, १८ मोबाईल टॉवर सील
- इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पँथर्स रिपब्लिकनचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
- उर्जा विभागाच्या महाकृषी उर्जा अभियानात २९ शेतकरी मुक्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
